मुक्तपीठ टीम
“नो मीन्स नो” अमिताभ बच्चन यांच्या पिंक चित्रपटामधील डायलॉग कुणीही संवेदनशील असेल तो विसरणार नाहीच. पण ज्यांच्या भावना मेलेल्या असतील त्यांनाही खडबडून जागं करण्याची शक्ती असलेला. हाच डायलॉग हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयात निनादला. १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. त्या आरोपीने आमच्यात परस्पर सहमतीने संबंध होते, असा दावा केला. त्यावेळी न्यायाधीशांनी “नो मीन्स नो”चा अर्थ हा “नाही म्हणजे नाहीच”, असे खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाने हेही सांगितले की इतका साधा अर्थ काही पुरुषांना कळत नाही.
हिमाचल प्रदेशच्या राजगड येथे अल्पवयीन पीडित मुलीच्या वतीने एफआयआर दाखल केल्यानंतर गेल्या वर्षी १८ डिसेंबरला आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, १७ डिसेंबर रोजी पीडित मुलगी बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपीने तिला त्याच्या जीपमधून घरापर्यंत सोडण्याची ऑफर दिली. पीडित मुलगी जीपमध्ये बसली होती, आरोपींनी अचानक गाडीचा मार्ग बदलला, एका निर्मनुष्य जागेवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
न्यायाधीश अनूप चितकरा यांनी आपल्या आदेशात मुलीने आरोपीला ‘नाही’ असे म्हटले होते, याचा उल्लेख केला आहे. मात्र, आरोपीने मुलीशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडे लग्नाचा प्रस्तावही मांडला. जेव्हा मुलीने नकार दिला तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला रस्त्यावर सोडले. यानंतर ही मुलगी बसने घरी पोहोचली आणि तिने संपूर्ण घटनेबद्दल आईला सांगितले आणि त्यानंतर कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला.
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. हा अर्ज फेटाळताना न्यायाधीश चितकारा म्हणाले, ‘नाही चा अर्थ हा नाही असतो – हे साधे काही पुरुषांना समजणे कठीण वाटते. नाही म्हणजे हो नाही, याचा अर्थ असा नाही की ती मुलगी लाजाळू आहे, याचा अर्थ असा नाही की मुलीला हवं की त्या मुलाने मनधरणी करावी, तर याचा अर्थ असाही नाही की मुलाने मुलीचा पाठलाग करावावे. ‘नाही’ या शब्दाला स्पष्टीकरण किंवा सत्यता आवश्यक नाही. हे त्या टप्प्यावरच संपते आणि पुरुषाला थांबावेच लागेल.’
आदेश देताना न्यायाधीशांनी असेही म्हटले की मुलीने मुलाला स्पर्श करण्यास नकार दिला पण त्याने जबरदस्ती केली. त्यामध्ये कोठेही एकमेकांची मर्जी आणि प्रेम नव्हतं.न्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की मुलीने हे सहजपणे घरच्यापासून लपवलं असतं पण तिने असं नाही केलं जे या प्रकरणातील सत्य दर्शवते.