मुक्तपीठ टीम
काही ठराविक चॅनेल्स टीआरपी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका ठेवून बार्कच्या दोन सीओओ आणि रिपब्लिक चॅनेल्सचे सीईओ अशा तिघांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सोमवारी ३६०० पानाचे आरोपपत्र सादर केले असून त्यात ५१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी बारा आरोपींविरुद्ध चौदाशे पानांचे तर आता ३६०० पानांचे असे एकूण पाच हजार पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या सर्व आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. टीआरपी वाढविण्यासाठी चॅनेल्सकडून आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत अमीत मदनमोहन दवे (महामूव्ही चॅनेल), संजय सुखदेव वर्मा (महामूव्ही चॅनेल), महामूव्ही चॅनेलचे मालक/चालक/त्यांचे संबंधित व्यक्ती, प्रिया मुखर्जी (रिपब्लिक टिव्ही), सुब्रमण्यम सुंदरम (रिपब्लिक टिव्ही), शिवेंद्र मुलहेरकर (रिपब्लिक टिव्ही), रणजीत वॉल्टर (रिपब्लिक टिव्ही), रिपब्लिक टिव्ही चॅनेल्सचे मालक/चालक/त्यांचे संबंधित व्यक्ती, रॉकी, वॉव मुझीक चॅनेल्सचे मालक/चालक/त्यांचे संबंधित व्यक्ती आणि अन्य आरोपींचा समावेश आहे.
विकास शंकरलाल खानचंदानी, रोमिल विनोदकुमार रामगडिया आणि पार्थ निर्मल दासगुप्ता अशी सोमवारी दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रातील आरोपींची नावे आहेत. यापूर्वी याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या विशाल वेद भंडारी, बोमपेल्लीराव नारायण मिस्त्री, शिरीष सतीश पत्तनशेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विनय राजेंद्र त्रिपाठी, उमेश चंद्रकांत मिश्रा, रामजी दुधनाथ शर्मा, दिनेशकुमार पन्नालाल विश्वकर्मा, हरिष कमलाकर पाटील, अभिषेक भजनदास कोलवडे ऊर्फ अजीत ऊर्फ अमीत ऊर्फ महाडिक, आशिष अभिदूर चौधरी, धनश्याम दिलीपकुमार सिंग या बाराजणांवर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४०६, १७४, १७९, १२० ब, २०१, २०४, २१२, ३४ भादवी कलमांतर्गत आरोपपत्र सादर करण्यात आले आहेत. सोमवारी दाखल झालेले पुरवणी आरोपपत्र असून या गुन्ह्यांचा पुढील तपास हा क्रिमिनल प्रोसिजर कोडमधील तरतुदींनुसार चालू राहणार आहे. गुन्ह्यांच्या पुढील तपासमध्ये मिळून आलेल्या पुराव्यांच्या आधारे या आरोपींसह पाहिजे आरोपीविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर केले जाणार आहे. टीआरपीमध्ये फेरफार करुन चुकीच्या पद्धतीने टीआरपी वाढविण्यात आल्याची तक्रार बीएआरसी कंपनीने काम दिलेल्या हंसा कंपनीच्या निदर्शनास आले होते. कंपनीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हे शाखेत संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल होताच दोन खाजगी चॅनेल्सच्या मालकासह हंसा कंपनीच्या काही कर्मचार्यांना पोलिसांनी अटक केली होती. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे सात पथक विविध राज्यात गेली होती. याच गुन्ह्यांत पोलिसांनी काही जाहिरात कंपनीच्या वरिष्ठांची जबानी नोंदविली होती. या गुन्ह्यांत पोलिसांनी फॉरेन्सिक टिमची मदत घेतली होती. पहिले आरोपपत्र सादर केल्यानंतर याच गुन्ह्यांत १३ डिसेंबरला रिपब्लिक चॅनेल्सचा सीईओ विकास शंकरलाल खानखंदानी, बार्कचे दोन माजी सीओओ रोमिल विनोदकुमार रामगडिया आणि पार्थ निर्मल दासगुप्ता यांना १७ डिसेंबर आणि २४ डिसेंबरला पोलिसांनी अटक केली होती, या तिघांनी संबंधित चॅनेल्सचे टिआरपी वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, त्यासाठी त्यांना लाखो रुपये कमिशन म्हणून देण्यात आले होते, काही केबल ऑपरेटरांना हाताशी धरुन ही टीआरपी वाढविण्यात आली होती, त्यामुळे संबंधित केबल ऑपरेटरची पोलिसांनी जबानी नोंदवून त्यांना या गुन्ह्यांत साक्षीदार बनविले होते. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल फोन, लॅपटॉपसह बँक लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्या आहेत. चॅनेल्सच्या प्रमुखांशी आरोपींचे झालेले चॅट काढण्याचे काम सुरु आहे. काहींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.