मुक्तपीठ टीम
कोरोनाशी लढताना चारी बाजूने जेव्हा काळोख दाटल्यासारखा वाटतो त्याचवेळी काहींचे वेगळे प्रयत्न आणि त्यांना मिळणारे यश हे मनाला नवी उभारी देत असते. छोट्याशा परीराणीची कहाणीही तशीच आहे. मनात एक नवी आशा जागवणारी.
ही छोटीशी परीराणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावची. तिनं नुकतीच कोरोनावर मात केली. त्यानंतर व्हायरल झालेली ही पोस्ट जशी आहे तशी…
इच्छाशक्ती ठेवा…….
आमची परी ताई कोरोनला हरवू शकते तर मग तुम्हीही करोनाला हरवू शकतात. विशेष म्हणजे परीने लिव्हरच्या कर्करोगसोबत लढा देत असताना करोनावर मात केली आहे.
आठवड्यापूर्वी एक परी अंबुलन्स मध्ये शेवटच्या घटका मोजत आहे. तिला व्हेंटिलेटर ऑक्सिजन नसलं तरी फक्त आमच्या समाधान साठी बेड द्या, अशी मागणी पालकांनी चाळीसगाव विकास मंच कडे केली होती. परी आधीच लिव्हरच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. त्यात कोरोना. अशा परिस्थितीत बेड मिळणं कठिणच होत. आम्ही बेडसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केला पण सर्वत्र नकार मिळाला. अखेर पाचोरा उप जिल्हा रुग्णालयात डॉ अमित साळुंखे यांनी आमच्या विनंतीवर एक स्टोअर रूम स्वछ करून परीला भरती केलं.
आठवड्यात डॉ. अमित आणि त्याच्या टीम ने अथक प्रयत्न करून परीला बर उपचार केले आहे. विशेष म्हणजे परीला कुठलाही रेमडेसिविर दिलं नाही. किंवा तिला व्हेंटिलेटरवर देखील ठेवलं नाही. एक मदत म्हणून ऑक्सिजन लावण्यात आला होता. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणेच तिच्यावर उपचार झाले. आज परी पूर्णपणे बरी झाली असून परीला तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे.
परीच्या इच्छाशक्तीला सलाम…
आम्ही ठरवलंय परीच्या कँसर साठी चाळीसगाव विकास मंच वैद्यकीय उपचारात मदत करणार आहे. परीची आई आणि आजोबा कोरोनाबाधित आहेत. त्यांना ही चाळीसगाव विकास मंच सहकार्य करीत आहे.
Thanks U …thanks U .. Dr अमित आणि टीम.
माझे सहकारी मनोज पाटील आणि संदीप साळुंखे यांचेही आभार
आपला
प्रफुल्ल साळुंखे
चाळीसगाव विकास मंच
परीच्या कोरोनावरील विजयात चाळीसगाव विकास मंचचे अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे, त्यांचे सहकारी मनोज पाटील आणि संदीप साळुंखे यांचाही वाटा आहे. अर्थातच त्यांना साथ देणारे पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमित साळुंखे यांचा सर्वात मोठा. एकही बेड उपलब्ध नसल्याने सारी दारं बंद झाल्यासारखी वाटली तेव्हा डॉ. अमित यांनी रुग्णालयातील स्टोअर रुमचा दरवाजा उघडला आणि परीसाठी जीवनाचा दरवाजाच पुन्हा उघडला गेला. स्टोअऱ रुम स्वच्छ करुन डॉ. अमित यांनी तेथेच बेड लावला, परीवर उपचार केले आणि परी पुन्हा नव्यानं कर्करोगाशी झुंज देण्यासाठी सज्ज झाली. कोरोनाप्रमाणेच ती कर्करोगावरही मात करेलच करेल. प्रफुल्ल साळुंखे, डॉ. अमित साळुंखे यांचे अभिनंदन करतानाच परीराणीलाही निरोगी जीवन लवकरच जगता यावं यासाठी मुक्तपीठ टीमच्या सदिच्छा…
पाहा व्हिडीओ: