हेरंब कुलकर्णी
भाजपाचे नेते अवधूत वाघ याचे ट्विट हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. किंवा वाद व्हावा असेच त्याचे ट्विट असतात. आजही त्यांनी एक ट्विट केले. नागपुरात नुकतंच निधन झालेले नारायण दाभाडकर यांचा उल्लेख करत त्यांनी ट्विट केले. त्यांचं गुणगाण केलं असतं तर तो त्यांचा विषय असता. पण त्यांनी दाभाडकरांना विनाकारण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपल्या प्राणांचेही बलिदान करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी जोडत वेगळा वाद निर्माण केला. त्यातही त्यांचे विधान चिथवणारे मानले गेले. त्यामुळे उसळलेल्या वादावर हेरंब कुलकर्णी यांनी भाजपाच्या नेतृत्वाकडून काही मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला आहे.
आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…….
— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) April 29, 2021
१) अवधूत वाघ पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यामुळे ते पक्षाची भूमिका मांडत असतात असे आम्ही समजतो. दाभोलकर यांचे संस्कार महाराष्ट्राला नकोत ही भारतीय जनता पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे काय ? हे पक्षाचे अध्यक्ष व विरोधी पक्ष नेते यांनी स्पष्ट करावे
२)दाभोलकरांचे कोणते संस्कार तुम्हाला नको आहेत हे तपशीलवार सांगण्याची आवश्यकता आहे. आपल्या विचारांसाठी प्रत्यक्ष हौतात्म्य पत्करले हा संस्कार जर चूक असेल तर त्या मग तो खून अवधूत वाघ समर्थनीय मानतात काय हेही स्पष्ट करावे
३)प्रत्यक्ष यशस्वी डॉक्टर असताना डॉक्टरकी न करता संपूर्ण आयुष्य सामाजिक प्रबोधनासाठी घालवले हा त्यागाचा संस्कार तुम्हाला नको वाटतो काय ? दाभाडकर यांच्या त्यागाचे कौतुक करताना हा त्याग तुम्हाला का नकोसा वाटतो ? हे ही स्पष्ट करावे
४) दाभोलकर .अंधश्रद्धांना विरोध करत होते व वैज्ञानिक संस्कार रुजवत होते.दाभोलकर यांचे संस्कार नको आहेत म्हणजे त्या अंधश्रद्धा तुम्हाला समर्थनीय वाटतात काय ? व ते रुजवत असलेल्या विज्ञानाचा संस्कार नकोसा वाटतो काय हेही स्पष्ट करावे
५)अवधूत वाघ यांच्या ट्विट च्या निमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नांना आता तुम्ही उत्तरे दिली पाहिजेत कारण अवधूत वाघ हे केवळ कार्यकर्ते नाहीत तर पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्ती आहेत.
(हेरंबकुलकर्णी हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात संवेदनशीलतेनं वावरणारे कार्यकर्ते अभ्यासक आहेत)