मुक्तपीठ टीम
आजही सामान्य माणसंच काय अति उचभ्रू समाजातही डॉक्टरांना देवासारखं मानलं जातं. सध्याच्या कोरोना संकटात रुग्णांच्या सेवेसाठी प्रसंगी आपले प्राणही धोक्यात टाकणारे…अगदी देवासारखे धावून येणारे अनेक डॉक्टर आणि इतर आरोग्य रक्षक आहेत. अशांच्या सेवाभावाची दखल घेतलीच पाहिजे. त्यातही पुन्हा पदरचे पैसे खर्च करून रुग्णांवर मोफत उपचार करणारी डॉक्टर असेल तर तिला या महासंकटातील महानायिकाच म्हटले पाहिजे. मोफत रुग्णसेवा करणाऱ्या अशा एक डॉक्टर चंद्रपुरात आहेत. डॉ. अभिलाषा गावतुरे या कोरोना रुग्णांची मोफत सेवा करीत आहेत.
महाराष्ट्राच्या इतर भागासारखीच चंद्रपूरमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे नसतात. चंद्रपुरात अशा घरातच विलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांसाठी डॉक्टर तीन ते सहा हजार रुपये प्रति रुग्ण शुल्क आकारतात. बहुतांश बाधितांना कोरोना संकटात योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाची गरज असते. मात्र, डॉ. अभिलाषा या आपल्याकडे येणाऱ्या सर्वच रुग्णांवर निशुल्क उपचार करत आहेत.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी निशुल्क उपचार सुरु करताच त्यांना रोज शेकडो फोन कॉल्स येत असतात. त्यांनी इतर डॉक्टरांसाठी एक आदर्श ठेवला आहे. एकदा व्यक्ती बाधित झाला की त्यावर होणारा खर्च रुग्णवाहिका- औषधे- ऑक्सिजन- व्हेंटिलेटर- रेमडीसीविर इंजेक्शन यामुळे रुग्णाच्या कुटुंबांना वेगळाच ताण येतो. अनेकांना ते परवडणारे नसते. त्यामुळे प्राण गमावण्याचा धोका निर्माण होतो. मात्र समाजात डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यासारख्या डॉक्टरांची संख्या आणखी वाढणे आवश्यक आहे. तसे झाल्यास कोणाचाही पैशाअभावी उपचाराचा हक्क डावलला जाणार नाही. गरजू रुग्णांनाही आधार देत कोरोनाशी सामना करुन माणसांना जिंकता येईल.
पाहा व्हिडीओ: