तुळशीदास भोईटे/सरळस्पष्ट
सुरुवातीलाच अनुपम खेरांचे ते ट्विट:
“आदरणीय
@ShekharGupta
जी!! ये कुछ ज़्यादा ही हो गया।आपके स्टैंडर्ड से भी।करोना एक विपदा है।पूरी दुनिया के लिए।हमने इस महामारी का सामना पहले कभी नहीं किया।सरकार की आलोचना ज़रूरी है।उनपे तोहमत लगाइए।पर इससे जूझना हम सबकी भी ज़िम्मेदारी है।वैसे घबराइए मत।आएगा तो मोदी ही!! जय हो!Folded hands”
आदरणीय @ShekharGupta जी!! ये कुछ ज़्यादा ही हो गया।आपके स्टैंडर्ड से भी।करोना एक विपदा है।पूरी दुनिया के लिए।हमने इस महामारी का सामना पहले कभी नहीं किया।सरकार की आलोचना ज़रूरी है।उनपे तोहमत लगाइए।पर इससे जूझना हम सबकी भी ज़िम्मेदारी है।वैसे घबराइए मत।आएगा तो मोदी ही!! जय हो!🙏 https://t.co/YZPzY4sVJh
— Anupam Kher (@AnupamPKher) April 25, 2021
देशासाठी रोजचा दिवसच नव्या दु:खाचा ठरत असताना ज्यांच्या तोंडी सांत्वनाऐवजी, दिलाशाच्या दोन शब्दांऐवजी उद्दामपणे सत्तेत पुन्हा आमचाच नेता परतणार असा दावा करणारे शब्द येतात, जे दु:ख व्यक्त करण्याऐवजी त्या नेत्याचा जय हो करतात, तेव्हा एक नक्की असतं ती माणसं नसतात! ते जसं वागतात त्याला माज म्हणतात!!
कोरोना जगासाठी आपत्ती आहेच. काही शंका नाही. कोरोनासाठी त्यामुळे मीही आजवर सत्तेत बसलेल्यांना विनाकारण दोष दिलेला नाही. पण जर कोणाच्याही राजकीय स्वार्थामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असेल, जर कुणाच्या गलिच्छ राजकारणामुळे सामान्य जनता आरोग्य सुविधा, औषधे, ऑक्सिजन या हक्काच्या बाबींपासून वंचित राहत असेल आणि सर्वात महत्वाचं जागतिक संकटापासून जनतेला वाचवण्यात जर संबंधित यंत्रणा कमी पडत असेल तर दोष द्यावा लागणारच. जाणीवपूर्वक तसे केलं जात असेल तर झोडावंही लागणारच. अनुपम खेर यांनी जी बकवास केली आहे. ती जिवंत मनाचा माणूस करुच शकत नाही. त्याला माज म्हणतात माज!
अनुपम खेर एक ज्येष्ठ अभिनेते. आदर आहेच. त्यांचा अभिनय आवडतोही. मी जगात कुणाचाही फॅन नाही. त्यामुळे त्यांचाही नाही. पण आदर असलेला माणूस जेव्हा असं असंवेदनशीलतेनं वागतो तेव्हा शेंदूर खरवडल्यानंतर उघडा पडलेला दगडच दिसतो. खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण करावे. जय बोलावेच. गैर नाही. पण कुठे. त्याची जागा कोरोना परिस्थितीबद्दलच्या पत्रकाराच्या ट्विटला उत्तर ही असूच शकत नाही.
काय म्हणाले होते शेखर गुप्ता? त्यांनी सध्याच्या भीषण परिस्थितीवरील भावना व्यक्त केल्या. ते म्हणालेत, “साठच्या दशकातील माझा जन्म. मी प्रत्येक संकट पाहिले आहे, ज्यात ३ युद्ध, अन्नटंचाई, आपत्ती यांचा समावेश आहे. फाळणीनंतरचे (कोरोना) हे आमचे सर्वात मोठे संकट आहे आणि भारताने अशी परिस्थिती हाताळताना निष्क्रिय सरकार कधीही पाहिले नाही. कॉल करण्यासाठी कोणतेही नियंत्रण कक्ष नाहीत, कोणीही जबाबदार नाही. हे कारभाराचं घोर अपयश आहे.”
As a child of the sixties, I’ve seen every crisis, incl 3 full wars, food shortages, calamities. This is our biggest post-Partition crisis & never has India seen a Govt missing in action like this. No control rooms to call, nobody accountable to reach. It’s a governance rout.
— Shekhar Gupta (@ShekharGupta) April 25, 2021
आताच एक ट्विट पाहिलं. मध्यप्रदेशातील एक रुग्णवाहिका रुग्णालयातून बाहेर येते. वळणावर तिच्या तुटक्या पत्र्यातून की काच फुटलेल्या खिडकीतून एका कोरोना बळीचा मृतदेह रस्त्यावर पडतो. संताप येणार नाही, ही विटंबना पाहून? असाच संताप धुळ्यात रुग्णवाहिका नसल्याने कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह नेताना पाहिला तेव्हा आला. एक संतापच बातमी लिहिताना मनात दाटलेला. तो मांडलाही. जेव्हा देशभरातील स्मशानांमधून सामूहिक अंत्यविधीच्या ज्वाला भडकलेल्या दिसतात, जेव्हा निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला दिसतो. मागणी केल्यानंतरही आठ टप्प्यातच मतदान घेतले जाते आणि कोलकात्यात प्रत्येक दुसरा माणूस कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागतो, तेव्हा अशा निवडणूक केंद्रीत सरकारचा राग येणार नाही?
मध्यप्रदेश शववाहिनी की हालत 😖 pic.twitter.com/khntREhYlg
— Straight Forward (@Raja_Africa) April 25, 2021
काय गैर आहे शेखर गुप्ता म्हणाले त्यात. आजच कळलं, नीती आयोगाचे सदस्य पॉल यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा उद्रेक उळाळेल, आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन लागेल. त्यासाठी प्लान बी तयार ठेवावा लागेल. असा अलर्ट जारी केला होता. पण काय झालं? काहीच नाही. जर वेळीच केंद्र सरकारची यंत्रणा जागली असती, निवडणुकीच्या प्रचारापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य कारभाराला महत्व दिले असते. तर ऑक्सिजनचीच नाही तर इतरही सर्व व्यवस्था योग्यरीत्या वेळेत झाली असती. ती झाली नाही. कारभाराऐवजी सत्ताकारणात सत्ताधारी मश्गूल राहिले त्यातूनच कारभार थांबला. थबकला. मग जर शेखर गुप्ता कारभाराचं सपशेल अपयश म्हणाले तर गैर काय?
तरीही भाजपाच्या नेत्यांनी, समर्थकांनी शेखर गुप्ता किंवा अन्य विरोधी मत मांडणाऱ्यांना ट्रोल केले. टीका केली. तर मी गैर मानत नाही. करा. अभिव्यक्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुणी विचारपूर्वक विचार मांडतं, कुणी सडलेल्या मेंदूतून विखार पसरवतं. ज्याचा त्याचा अधिकार. परंतु, अनुपम खेरांच्या ट्विटला आक्षेप आहे, तो त्यांनी त्यांची बाजू मांडत शेखर गुप्तांना सुनावत असताना शेवटी वापरलेले शब्द. त्यांनी आधी शेखर गुप्तांवर टीका केली. अधिकार आहे त्यांचा. ते म्हणालेत तशी कोरोना ही जागतिक आपत्तीच. कोरोनाशी लढा ही सरकारचीच नाही पण आपलीही जबाबदारी आहेच. आपला नेता पुन्हा येणार असे म्हणणेही गैर नाहीच . खेरच काय इतरही कुणी ते म्हणावे. पण ते कधी, कुठे हे महत्वाचे असते. शेवटी ते म्हणालेत, “वैसे घबराइए मत।आएगा तो मोदी ही!! जय हो!” खुपते ते हे. मोदी पुन्हा येवो किंवा आणखी कुणी. माझ्यासारख्यांना फरक पडत नाही. पण देशभर सतत चिता भडकत असताना, रोज कुणी तरी परिचित आता आपल्याला कधीच भेटणार नाही, असे कळत असताना, ऑक्सिजन नसल्यामुळे शेकडो शेवटचा श्वासही न घेता प्राण गमावत असताना ज्यांना “पुन्हा येणार तर मोदीच” असा दर्पयुक्त माज दाखवावासा वाटतो, तेव्हा लक्षात येतं ही माणसं असूच शकत नाहीत. देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलेल्या ट्विटला उत्तर देताना “वैसे घबराइए मत।आएगा तो मोदी ही!! जय हो!” असे उत्तरात ठणकावलं जात तेव्हा त्याला एक माजाचा दर्प येतो. आक्षेप तेथे!
भाजपाकडे निवडणूक जिंकण्यासाठी नवी रणनीती आहे. नवी यंत्रणा आहे. ते जिंकतात. परंतु शेवटी हे सारं करण्यासाठी लोकही लागतात. त्यांच्या चिता भडकत असताना जर कुणी सत्तेच्या भाकऱ्या भाजू पाहत असेल तर शेवटी तसं करणाऱ्यांचेच हात चांगलेच भाजतील. लक्षात ठेवा, शेवटी लोकांना ऑक्सिजन देणारे आवडतात, ऑक्सिजनच्या ट्युबवर पाय ठेवणारे नाहीत. एवढं नक्की!
तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ www.mukpeeth.comचे संपादक आहेत.
संपर्क 9833794961 कृपया थेट कॉल करा ट्विटर @TulsidasBhoite