मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जगभरातील तज्ज्ञांचे इशारे गांभीर्याने घेतले पाहिजे होते. पंतप्रधान मोदी यांनी येणारी लाट ही त्सुनामीच असेल ही दुसऱ्या लाटेची मन की बात समजून घेतली पाहिजे होती. तसे केले असते तर आता देशाला कोरोनाच्या त्सुनामीच गटांगळ्या खाव्या लागल्या नसत्या, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
कोरोनाचा प्रकोप सुरुच
• देशात गेल्या २४ तासांत सलग चौथ्या दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली तर २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला.
• गेल्या आठवड्यात २४ तासांतील कोरोना रुग्णवाढीचा दर दोन-अडीच लाखांच्या आसपास होता.
• गेल्या चार दिवसांपासून तीन लाखांच्या वर गेला आहे.
• दुसऱ्या कोरोना तडाख्याने सर्वच व्यवस्थांची अवस्था हतबल करून टाकली आहे.
• जसा कोरोना रुग्णवाढीचा रोज उच्चांक गाठला जात आहे तसा मृत्यूचा आकडाही भयंकर प्रमाणात वाढत आहे.
इशारा काळजाचा ठोका चुकविणारा..
• अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिटयूट फॉर हेल्थ मैट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशनने दिलेला इशारा काळजाचा ठोका चुकविणाराच आहे.
• या संस्थेने काढलेल्या निष्कर्षानुसार मे महिन्यात भारतात रोजचा कोरोना मृतांचा आकडा पाच हजारांवर पोहोचू शकतो.
• १२ एप्रिल ते १ ऑगस्ट २०२१ या कालावधीत देशातील कोरोना मृतांची संख्या तीन लाखांच्या पार जाऊ शकते.
• वॉशिंग्टनच्या या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्र सरकारने गांभीयनि घ्यायला हवा.
• गेल्या वर्षीही कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी परदेशी संस्थांनी असे इशारे दिले होते.
• पण सुदैवाने परिस्थिती आटोक्यात राहिली होती.
• त्यामुळे या इशाऱ्यांबाबत सरकार समर्थक मंडळींकडून शेरेबाजीही करण्यात आली होती.
• मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे.
दुसरी लाट त्सुनामीच..
• कोरोनाला गांभीर्याने घेतले नाही, तर कोरोनाची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल.
• आज नवे कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या याचे जागतिक विक्रमः नोंदविले जात आहेत.
• ऑक्सिजन अभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत.
• या सगळ्याच परिस्थितीचे खापर फक्त कोरोनाच्या त्सुनामीवर फोडता येणार नाही.
• आता सरकारतर्फे देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेद्वारे केला जात आहे, त्यासाठी लष्कराचेही सहाय्य घेतले जात आहे.
• कोरोना लस, वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे यांच्या सीमाशुल्कात सूट देण्याचाही निर्णय केंद्राने घेतला आहे.
• रेमडेसिवीरसारख्या अत्यंत तुटवडा जाणवणाऱ्या इंजेक्शनचाही पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे.
• हे सगळे ठीकच आहे, पण बेकाबू होऊ पाहणाऱ्या कोरोनाचे काय? हतबल झालेली आरोग्य व्यवस्था, उपचाराअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय? आग्रा येथील एक बातमी मन विषण्ण करणारी आहे.
• बेड न मिळाल्याने ऑक्सिजन अभावी तडफडणाऱ्या पतीला रिक्षातच आपल्या तोंडाने श्वास देऊन त्याचे प्राण वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न त्याची पत्नी करीत होती. ही बातमी कोरोनाबाबतच्या पर्दाफाश करणारी आहे.
दुसऱ्या लाटेचे चित्र भयंकर
• गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मैलोन्मैल पायपीट करीत आपल्या गावी निघाले स्थलांतरितांचे लोंढे जगाला दिसले.
• आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना, ऑक्सिजन बेडअभावी कोरोना रुग्णांचे जीव जाताना जग पाहत आहे.
• हे सगळेच चित्र भयंकर आहे.
• सरकारकडून जे उपाय केले जात आहेत त्यामुळे भविष्यात कोरोना त्सुनामीचा प्रकोप कमी होईलही, पण तोपर्यंत ना गेलेले जीव परत येतील, ना त्यांची उद्ध्वस्त कुटुंबे सावरले जातील.
• पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कोरोनाची दुसरी लाट, त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली.
• ही लढाई सुरू आहे हे खरेच, पण ती सुरू होण्यापूर्वी केंद्राने काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर?
• तज्ज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती त्सुनामी’च असेल ही दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळया खाण्याची वेळ आली नसती.