मुक्तपीठ टीम
संपूर्ण देशभरात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे कोरोना उफाळतो आहे आणि दुसरीकडे कधी रेमडेसिविर, कधी ऑक्सिजन तर कधी मुळातच उपचारासाठी सामान्यांची धडफड सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहर आणि जिल्हा तर अवघ्या देशात कोरोनाची राजधानी ठरला आहे. कोरोना संकटात लोकांचे होणारे जीवघेणे हाल पाहून पुण्यातील जे राजकीय नेते सेवाभावानं पुढे सरसावलेत त्यांच्यातील एक आघाडीवरील नाव म्हणजे वसंत मोरे. मनसेचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक असणारे वसंत मोरे आजही वावरतात ते एखाद्या साध्या कार्यकर्त्यासारखे…सतत धावपळ. सतत काम आणि फक्त काम.
दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावेळेस मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी धोका पत्करुन मदतीचा हातपुढे केला आहे. केवळ ५ दिवसात पुण्यात ४० ऑक्सिजन बेड्स आणि ४० होम आयसोलेशन बेड्स उभारल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. यावेळी वसंत मोरे यांनी ट्वीट करून म्हटले की, “५ दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो तर मग पुणे महानगरपालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात १६८० बेड तयार झाले असते.”
नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणेकरांच्या मदतीसाठी पुढे केलेला हात पाहून सर्वजण त्यांचे कौतुक तर करतच आहेत त्याचबरोबर सर्वांना त्यांच्याविषयी आपुलकी जाणवते. तसेच वसंत मोरे यांनाही आपल्यासोबत कार्य करणाऱ्यांची आणि सोबत असणाऱ्यांची आपुलकी आहे. या आपुलकीतुनच त्यांनी एक घडलेली घटना ट्विटरवर शेअर केली आहे, “हा आहे साई स्नेह कोरोना सेंटरचा स्टाफ इनचार्ज यशवंत चोरगे! याच्यावर संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ आणि हॉस्पिटलची नियोजनाची जबाबदारी आहे. काल कोरोना सेंटरचे उद्घाटन झाले आणि आज सकाळी ११ वा या यशवंतचा चुलत भाऊ मंगेश चोरगे याचे कोल्हापूर येथे अपघाती निधन झाले. जगताप सरांच्या स्पष्ट सूचना होत्या, आजचे सर्व पेशंट स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत कोणीही फोन घेणार नाही. त्यामुळे याने घरचे फोन घेतले नाहीत, दुपारी यशवंतला बातमी बाहेरून समजली आणि त्याच्या पायाखालची जमीन हादरली. आहे तसाच तो कोल्हापूरला मातीला गेला आणि आत्ता मी पाहतो तर काय, परत ११ ला हा यशवंत कर्तव्यावर हजर होता. यशवंत सलाम तुझ्या कर्तृत्वाला.”
ही माहिती त्यांनी ट्विटर अकाउंन्ट वरून दिली. यातून त्यांच्यासोबत कार्यरत असणाऱ्याचे कामाविषयीचे प्रेम आणि वसंत मोरे यांचे त्यांच्यावरील प्रेम दिसून येते.
वसंत मोरेंच्या आपलुकीच्या कामांमुळे लोकही त्यांच्याशी वेगळ्या नात्यानं जोडली गेली आहेत. त्यांच्यासाठी वसंत मोरे फक्त नगरसेवक नसून त्यांच्यावरील अन्यायाविरोधात लढणारे, त्यांच्या प्रत्येक समस्येला आपलं मानत सोडवण्याची धडपड करणारे जननायक आहेत. पुण्याचे अस्सल जननायक!
पाहा व्हिडीओ: