मुक्तपीठ टीम
कोरोना देशी लस कोव्हॅक्सिन या लसीचे दर जाहीर केले गेले आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्य सरकारला ६०० रुपये, खासगी रुग्णालयांना प्रतिडोस १२०० रुपयांना मिळेल. निर्यातीसाठी कंपनीने १५ ते २० डॉलर किंमतीची घोषणा केली आहे. खासगी सीरम इन्स्टिट्युट बनवत असलेली परदेशी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशिल्ड लस खूपच स्वस्त वाटावी असे दर भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनसाठी जाहीर करण्यात आले आहेत.
देशात मंजूरी मिळणारी दुसरी कोविशील्ड बनवणाऱ्या सीरम इंस्टीट्यूटने बुधवारी नवीन दर जाहीर केले. कोव्हीशील्ड खासगी रुग्णालयांना ६०० रुपये, राज्य सरकारांना ४०० रुपयांना आणि केंद्राला पूर्वीप्रमाणे १५० रुपयांना मिळणार आहे.
जगातील सर्वात यशस्वी लसींमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश
- भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या प्रयत्नाने तयार केलेली कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी कोरोना लस जगातील सर्वात यशस्वी लसींपैकी एक आहे.
- फेज-३ क्लिनिकल चाचण्यांच्या दुसर्या अंतरिम निकालांच्या आधारे कंपनीने असा दावा केला आहे की लसीची क्लिनिकल कार्यक्षमता ७८% आहे.
- याचा अर्थ असा आहे की कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही ७८% प्रभावी आहे.
- चांगली गोष्ट अशी आहे की चाचण्यांमध्ये ज्या लोकांना ही लस दिली गेली त्यापैकी कोणालाही कोणतीही गंभीर लक्षणे दिसली नाहीत.
- म्हणजेच, गंभीर लक्षणे रोखण्याच्या बाबतीत या लसीचा प्रभावीपणा १००% आहे.
कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढणार
- भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला.
- आता दरवर्षी ७० कोटी डोस तयार केले जातील.
- कंपनीने हैदराबाद आणि बंगळुरू येथे आपल्या प्लांटची क्षमता वाढविली आहे.
- उत्पादन जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत पोहोचण्यास २ महिने लागतील.
- कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने भारत बायोटेक कंपनीला १,५६७.५० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जाहीर केली आहे.
- दरमहा ५.३५ कोटी लस तयार केल्या जातील.
- जुलैपासून ते दरमहा ५.३५ कोटी लस तयार करण्यास सुरुवात करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
- मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्युटही भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस तयार करणार आहे.