मुक्तपीठ टीम
जागतिक किर्तीचे गीतकार, लोककवी हरेंद्र जाधव यांचे वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने नवी मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. “पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणता ते दावशील का, तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा…” अशा हजारो अवीट गोडीच्या गीतांमागे असलेले असामान्य, प्रतिभाशाली कवी म्हणजे हरेंद्र जाधव. एकाच वेळी भीमगीते आणि भक्तीगीते समान ताकतीनं लिहिणाऱ्या कवी हरेंद्र जाधव यांना मुक्तपीठ परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कन्या तारका हरेंद्र जाधव आणि कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
हरेंद्र जाधवांच्या साहित्यिक, सामाजिक सहवासात वावरण्याची संधी लाभलेले साहित्यिक शरद शेजवळ यांनी वाहिलेली शब्दांजली:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याने प्रभावित झालेल्या पिढीतील लोककवी म्हणजे हरेंद्र जाधव! ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्याचा वारसा आपल्या हजारो बुद्ध-आंबेडकरी गीतातून मांडून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला, त्या महान लोककवी-गीतकाराला आज आपण मुकलो आहोत. एकीकडे भीमगीते दुसरीकडे भक्तीगीते…लोकगीतं…ते जे लिहित ते सारंच गाजत असे…मनातून उचंबळलेले शब्द कोट्यवधींच्या मनाला भिडत आहेत. तेही पिढ्यान पिढ्या!
आपल्या साहित्यिक प्रतिभेने लोकगीत, भाव-भक्तिगीते यातून लोकरंजनासोबतच लोक प्रबोधन करणारी शिक्षकी, साहित्य लेखणी आज कायमची विसावली आहे.
भीमगीतं…भक्तीगीतं…लोकगीतं…सारं अजरामर असं!
- पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायचा मळा
- तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा…
- आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणता ते दावशील का
- हे खरंच आहे खरं
- माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारू देव बाई पावलाय गो
- पिकवा शेतात अधिक धान्य
अशा हजारो अवीट गोडीच्या बुद्ध-आंबेडकरी, सामाजिक प्रबोधन, भाव-भक्ती तथा क्रांतीगीतांचे जन्मदाते असणारे हरेंद्र जाधव सामाजिक कार्यातही तेवढ्याच समरसतेनं सहभागी असत. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक, महाराष्ट्र या संस्थेचे ते संस्थापक आणि उपाध्यक्ष होते. जागतिक कीर्तीचे महान गीतकार लोककवी हरेंद्र जाधव आज वयाच्या ८७ व्या वर्षी या सृष्टीचा निरोप घेऊन काळाच्या पडद्याआड निघून गेले आहेत.
त्यांची गाणी त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासोबत जोडली गेली ती अशी
“जोवर धरती हरेन्द्रा कीर्ती राहील अजरामर!”
या गीताच्या ओळीप्रमाणे तोवर त्यांची लेखणी, गाणी यांची स्मृती प्रत्येक मराठी माणसाच्या मनात दरवळत राहिल.
दादांच्या साहित्य लेखनास विनम्र अभिवादन. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर (मिग) येथील भूमिपुत्रास अखेरची मानवंदना!
💐💐💐
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक ह्या स्वतः महाकवी वामनदादा कर्डक यांच्या कायदेशीर अनुमतीने आपण स्थापन केलेल्या संस्थेच्या पाया भरणीत आपण प्रतिष्ठानचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून घेतलेले श्रम आम्ही सदैव काळजात जपू व प्रतिष्ठानचे कार्य पुढे नेत राहू त्याच प्रमाणे आपल्या नांवे आपली कन्या तारका हरेंद्र जाधवने स्थापिलेल्या लोककवी हरेंद्र जाधव साहित्य संस्थेच्या साहित्य वेलीला आम्ही भावंडं भीमरायाच्या मळ्याची मशागत करत फुलवत राहू…!
शरद शेजवळ
💐💐💐
(शरद दिनकर शेजवळ हे साहित्यिक, शिक्षक असून लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिकचे संस्थापक कार्याध्यक्ष आहेत)