मुक्तपीठ टीम
देशातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी अत्यावश्यक ऑक्सिजनच्या टंचाईचं संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असतानाच कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी बळी जाण्याचं सत्र आजही सुरुच आहे. दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २५, अमृतसरमध्ये ६ आणि ग्वाल्हेरमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला. बीडमध्येही २ रुग्णांचा ऑक्सिजन कमतरतेमुळे बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाबरोबरच रुग्णांना भेडसावणारी ऑक्सिजन कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी बाहेरून ऑक्सिजन पुरवणे आवश्यक असते. पण सध्या रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनची मागणी वाढत असतानाच तेवढा पुरवठा वाढत नसल्याने अनेक रुग्णांचा शेवटचा श्वासही न घेता मृत्यू ओढवतो आहे.
देशातील रुग्णालयांमध्ये सध्या सुरू असलेल्या ऑक्सिजन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील चार शहरांतून वाईट बातम्या आल्या आहेत.
चार शहर, ३६ बळी!
• राजधानी दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयात २५ रुग्णांचा मृत्यू.
• पंजाबातील अमृतसरमध्ये ६ रुग्णांचा मृत्यू
• मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ३ मृत्यू
• महाराष्ट्रातील बीडमध्ये २ मृत्यूंची नातेवाईकांची तक्रार
राजधानी दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या रूग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी घसरल्यामुळे उच्च प्रवाही ऑक्सिजन पुरवला जात होता. ऑक्सिजनचा प्रवाह कमी झाल्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती आधीच गंभीर सुरू होती. हॉस्पिटल व्यवस्थापन सरकारच्या सतत संपर्कात असून ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दिल्लीतील सरोज हॉस्पिटलने ऑक्सिजनअभावी नवीन रुग्णांची भरती बंद केली आहे. काही रुग्णांना डिस्चार्जही केले आहे.
राजधानी बत्रा हॉस्पिटलचे एमडी डॉ. एस.सी.एल. गुप्ता म्हणाले की, १२ तासांच्या पाठपुराव्यानंतर केवळ ५०० लिटर ऑक्सिजन मिळाला आहे. आमची रोजची गरज ८ हजार लीटर आहे. आमच्याकडे रूग्णालयात ३५० रूग्ण आहेत. कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजन अत्यावश्यक आहे, परंतु जेव्हा आपल्याला तोच मिळत नाही तेव्हा आम्ही कोरोना रुग्णांवर उपचार कसे करायचे?