डॉ. प्रदीप आवटे
सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे तथापी आपण काही साध्यासुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण या संकटाची तीव्रता कमी करु शकतो.
आपण काय करु शकतो ?
सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे – कोरोनाची अनाठायी भिती बाळगू नका.
सर्वत्र याच आजाराचे नाव ऐकू येत असले तरी या आजारामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण १ टक्केपेक्षा कमी आहे, हे लक्षात ठेवू या. कोरोना झालेल्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला भेदभावाची वागणूक देऊ नका. परस्परांना मदत करा.
कोरोना प्रसार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या.
मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, योग्य शारिरिक अंतर पाळणे, गरज नसताना बाहेर न पडणे, हे साधेसुधे नियम पाळणे, आवश्यक आहे. तसेच आपण बाधित आल्यानंतर आपल्या संपर्कातील व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाला दिल्याने त्या व्यक्तींचा शोध लवकर घेता येतो आणि प्रसाराला आळा घालता येतो.
कोरोना आजाराची जोखीम कुणाला जास्त आहे ?
ज्यांचे वय ५० पेक्षा अधिक आहे, ज्यांना मधुमेह – उच्च रक्तदाब असे आजार किंवा लिव्हर, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे वजन जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये कोरोना आजाराची गुंतागुंत अधिक प्रमाणात होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोरोनाची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
कोरोनाची लक्षणे समजून घ्या आणि ती अंगावर काढू नका.
ताप, सर्दी, अंगदुखी, घशात खवखव, वास न येणे, थकवा, धाप लागणे ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही वेळा उलटी, जुलाब अशी वेगळी लक्षणेही आढळतात. ही लक्षणे आढळली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. रात्री झोप झाली नाही, काल काही तरी तेलकट खाण्यात आले म्हणून असे होत असेल असे म्हणून लक्षणे अंगावर काढू नका. आपल्याकडे ग्रामीण भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र कार्यरत आहे. या प्रत्येक उपकेंद्रात एक नर्स आणि एक आरोग्य सेवक आहेत. याशिवाय प्रत्येक तीस हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र ( पी एच सी) आहे. इथे जावून वैद्यकीय सल्ला घ्या. प्रत्येक आरोग्य केंद्रात ऍंटीजन टेस्टची व्यवस्था आहे. त्यामुळे करोना आजाराचे लवकर निदान होईल. वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्या. शहरी भागातही वेगवेगळया केंद्रांमध्ये टेस्टिंग, तपासणीची व्य्वस्था करण्यात आलेली आहे.
आपापल्या भागातील हेल्पलाईनची माहिती असणे आवश्यक आहे.
घरगुती विलगीकरण
कोरोनाचे बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे होऊ शकतात. पण …
कोणतेही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य स्वरुपाच्या प्रत्येक करोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज नाही. ज्या रुग्णाच्या घरी पुरेशी जागा आहे, रुग्णासाठी वेगळी खोली , टॉयलेट आहे अशा ठिकाणी लक्षणे विरहित किंवा सौम्य स्वरुपाच्या रुग्णाची देखभाल घरच्या घरी घेणे शक्य आहे. अर्थात या बाबत एकच एक नियम नाही, प्रत्येक रुग्णानुसार हा निर्णय घ्यावा लागतो. ज्यांचे घर छोटे आहे, रुग्णासाठी वेगळी खोली नाही तिथे हे शक्य नाही. तसेच लक्षणे जरी सौम्य असतील पण रुग्णास इतर जोखमीचे आजार असतील आणि वय जास्त असेल तर अशा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केलेले अधिक चांगले. हा निर्णय त्या त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी घेणे अधिक योग्य !
घरच्या घरी करोना रुग्णांची काळजी घेताना कोणते नियम पाळले पाहिजेत, हे समजून घेऊ या.
- रुग्णाने २४X७ वेगळ्या खोलीत रहायला हवे आणि हॉल/किचन मध्ये येणे पूर्णपणे टाळायला हवे.
- घरात वृध्द, लहान मुले, गरोदर महिला, जोखमीचे आजार असणा-या व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संपर्क टाळणे अधिक महत्वाचे !
- रुग्णाने आणि रुग्णाची काळजी घेणा-या व्यक्तीने ट्रिपल लेयर सर्जिकल मास्क वापरावा.
- घरातील निश्चित अशा एकाच व्यक्तीने रुग्णाची नियमित काळजी घ्यावी.
- काळजीवाहू व्यक्तीने आपल्या हाताची स्वच्छता जपली पाहिजे. काळजीवाहू व्यक्तीने घरातील वस्तू, पृष्ठभाग नियमित स्वच्छ करावेत.
रुग्णाचे कपडे, प्लेटस आणि इतर गोष्टी शेअर करु नयेत. - तास वापरुन झाल्यावर किंवा ओले /खराब झाल्यानंतर मास्क बदलावेत. मास्क प्रथम १ % सोडियम क्लोराईट द्रावणात टाकावेत आणि नंतर जाळून अथवा जमिनीत खोल पुरुन टाकावेत.
- रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु ठेवावेत.
- रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावा. तपमानाची नियमित नोंद ठेवावी. पल्सऑक्सीमिटरद्वारे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण दिवसातून ३ वेळा मोजावे.
- ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी होणे गंभीर आजाराचे लक्षण आहे. दिवसातून एक वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करा.
- रुग्णाने आपल्या प्रकृतीची माहिती दैनंदिन स्वरुपात स्थानिक डॉक्टरांना द्यावी. लक्षणे वाढत असल्यास डॉक्टर योग्य निर्णय घेऊ शकतात.
- आपण घरगुती विलगीकरणात आहोत आणि आपल्याला फारशी लक्षणे नाहीत म्हणून या रुग्णांनी छोट्या मोठ्या कारणांसाठी घराबाहेर पडणे, इतर लोकांसोबत मिसळणे टाळले पाहिजे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपले आयसोलेशन शिस्तीने पाळणे आवश्यक आहे.
करोना रुग्णाची काळजी घरगुती पातळीवर नीटपणे घेता यावी यासाठी स्थानिक डॉक्टर आणि रुग्ण यांचा उत्तम समन्वय असावा तरच ‘मेरा घर, मेरा अस्पताल’, हे प्रत्यक्षात येणे शक्य आहे.
सहा मिनिटे चालण्याची टेस्ट
जे रुग्ण घरी उपचार घेत आहेत त्यांनी दिवसातून कमीत कमी एक वेळा ही सोपी चाचणी करावी.
- तुमच्या बोटाला पल्सऑक्सी मीटर लावा आणि त्यावर दिसणाऱ्या तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.
- आता पल्सऑक्सीमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे फिरा.
- सहा मिनिटांचे चालणे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.
निष्कर्ष –
- सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर अगदी उत्तम.
- जर ती केवळ एक दोन टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करावयाचे कारण नाही.
- रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल किंवा चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा ३ टक्क्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम/धाप लागल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला ऑक्सीजन अपुरा पडतो आहे,असा त्याचा अर्थ होतो. वेळेत भरती होणे आवश्यक.
- ६० वर्षांवरील व्यक्ती साठी ६ मिनिटा ऐवजी ३ मिनिटांची वॉक टेस्ट करावयाला हरकत नाही.
या प्रकारे व्यवस्थित घरगुती काळजी घेतल्याने शंभरातील बहुसंख्य रुग्ण घरच्या घरी बरे होतात. आणि ज्यांना भरती करण्याची गरज आहे, ते वेळेत लक्षात येऊन त्यांना वेळेत भरती करता आल्याने गुंतागुंत आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागतो.
फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी – पोटावर झोपा
कोरोनाची लक्षणे असतील तर आपण जागेपणी पालथे झोपण्याची सवय लावावी. दिवसातील शक्य तेवढा वेळ पोटावर झोपल्यास फुप्फुसाचे सर्व भाग उघडले जाऊन ऑक्सिजन सर्व भागास पोहचतो. अगदी सुरुवातीपासून या पध्दतीचा वापर केल्यास त्याचा रुग्णाची ऑक्सिजन पातळी उत्तम ठेवण्यास मदत होते.
फुप्फुसाचा प्रत्येक भाग उघडला जावून ऑक्सिजन खोलपर्यंत पोहचावा यासाठी विविध प्रकारे ३० मिनिटे ते २ तास झोपल्यास त्याचा फायदा होतो.
- पोटावर झोपणे. श्वासास अडथळा येऊ नये यासाठी कपाळाखाली टॉवेलची घडी ठेवावी किंवा मान एका बाजूला वळवावी.
- उजव्या कुशीवर झोपणे.
- उठून पाठीवर मागे रेलून बसणे. अशा पध्दतीने बसताना पाठीला आवश्यक आधार द्यावा.
- डाव्या कुशीवर झोपणे.
- आणि पुन्हा पालथे पोटावर झोपणे.
हे करत असताना ऑक्सिजन पातळी मोजत जावी. या साध्या वाटणाऱ्या झोपण्याच्या प्रकारांमुळे ऑक्सिजनची पातळी राखण्यास मदत होते. मात्र म्हणजे हा प्रकार व्हेंटीलेटरला पर्याय आहे, असे नव्हे.
गुंतागुंत ओळखणाऱ्या रक्ताच्या तपासण्या
डॉक्टरांच्या सल्याने रक्तातील पांढ-या पेशींचे प्रमाण, डी डायमर, सी आर पी, एल डी एच अशा तपासण्या केल्याने संसर्गाची तीव्रता लवकर ओळखण्यास मदत होते. त्या नुसार रुग्णास वेळेत भरती करता येते. छातीचा एक्स रे – सी टी स्कॅनमुळेही संसर्ग तीव्रता वेळेमध्ये कळण्यास मदत होते.
उपचार पध्दती व औषधे
कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी आयवरमेक्टिन, डॉक्सीसायक्लीन, फॅविपिराविर , डेक्सामिथॅसोन, रेमडेसिविर, टोसिलोझुमॅब, प्लाझ्मा अशा अनेक औषधांचा वापर केला जातो. यातील कोणतीही उपचार पध्दती ही या आजारावरील रामबाण उपाय नाही. रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार आणि गरजेनुसार योग्य ती उपचार पध्दती देण्यात येते.
- कोणती औषधे घ्यावीत, याचा निर्णय डॉक्टरांनी घेणे आवश्यक आहे.
- कोरोना उपचारासाठी त्रिस्तरीय उपचार सुविधा
- कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात तीन स्तरीय रचना उभी करण्यात आलेली आहे.
- कोरोना केअर सेंटर – तालुका पातळीपासून ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यभरात अशी दोन हजाराहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये सौम्य स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो.
- कोरोना हेल्थ सेंटर – या केंद्रांमध्ये मध्यम स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार केला जातो. काही ऑक्सिजन बेडस देखील या केंद्रांमध्ये उपलब्ध असतात. तालुका आणि जिल्हा पातळीवर ही केंद्रे कार्यरत आहेत. राज्यात अशी सोळाशेहून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.
- कोरोना हॉस्पिटल – गंभीर स्वरुपाच्या रुग्णांसाठी ही केंद्रे कार्यरत आहेत. इथे ऑक्सिजन बेडस, व्हेंटीलेटर्स आणि अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध आहे. राज्यात सुमारे ९५० कोरोना हॉस्पिटल्स कार्यरत आहेत.
कोणत्या कोरोना रुग्णास भरती होणे आवश्यक आहे ?
- ज्याचे वय ५० पेक्षा अधिक आहे आणि ज्याला काही जोखमीचे आजार आहेत
- ज्याचा आजार सौम्य स्वरुपाचा आहे पण घरात पुरेशी जागा नाही.
- ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी आहे.
- ६ मिनिट वॉक टेस्ट नंतर ज्यांना धाप लागते किंवा ऑक्सिजन ९३ पेक्षा कमी होतो.
- ज्यांना मध्यम ते गंभीर स्वरुपाचा न्युमोनिया आहे
- ज्यांना सतात तीव्र ताप आहे
- रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाडाच्या खुणा
कोरोना कसा होतो, कसा पसरतो, तो टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि करोना झाला तर काय करायला हवे, निदान – उपचार सुविधा कुठे आहेत, याची पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार वागणे आवश्यक आहे. आजच्या संकटाच्या प्रसंगी छोटी छोटी वाटणारी माहिती हे संकट नाहीसे करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
(डॉ. प्रदीप आवटे हे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत. साथीच्या आजारांवर लक्ष ठेवणे, त्यांची सांख्यिकी मिळवून विश्लेषण करून उपाययोजना सुचवणे यात ते तज्ज्ञ आहेत. त्यांचे कोरोना संकट काळातील अथक, निरंतर कार्य महत्वाचे आहे.)