मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा संसर्ग उफाळला असतानाच ऑक्सिजन, रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे स्वाभाविकच टंचाई निर्माण झाल्याने काही अपप्रवृत्ती काळाबाजाराचा जीवघेणा धंदा करु लागल्या आहेत. त्याचवेळी मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा शाहनवाज शेख लोकांसाठी एक आदर्श बनला आहे. ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून प्रसिद्ध झालेला शेख एका फोन कॉलवर रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहेत. एवढेच नव्हे तर त्याने ऑक्सिजन पुरवठा सेवेसाठी स्वत:ची आलिशान एसयूव्ही गाडीही विकली आहे.
कोरोना संकटात सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासू लागताच शाहनवाज अस्वस्थ झाला. त्याला राहवले नाही. त्याने ठरवले काही झाले तरी चालेल पण लोकांना ऑक्सिजन पुरवायचा. त्यासाठी त्याने माहिती घेतली आणि ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा उभारली. लोकांना अडचण येऊ नये यासाठी त्याने एक ‘वॉर रुम’ ही तयार केली. यासाठी शाहनवाज याने काही दिवसांपूर्वी आपली २२ लाखांची एसयूव्ही विकली. आपल्या फोर्ड एंडेवरच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांनी शाहनवाजने १६० ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करुन गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत. शाहनवाज याने सांगितले की, गेल्या वर्षी लोकांच्या मदतीदरम्यान आमच्या जवळचे पैसे संपले. यामुळे मी माझी कार विकण्याचा निर्णय घेतला.
ऑक्सिजनमॅनला अशी मिळाली प्रेरणा…
- शाहनवाजने सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना कालावधीच्या सुरूवातीलाच त्याच्या एका मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजनअभावी ऑटो रिक्षात मृत्यू झाला.
- त्यानंतर त्यांनी आता मुंबईतील रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला.
- लोकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी शाहनवाजने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आणि वॉर रुमही बनवली.
- पूर्वी दिवसाला ५० आणि आता ५०० ते ६०० कॉल येत आहेत
- शाहनवाजने सांगितले की, या वेळी परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती.
- जानेवारीत जिथे ऑक्सिजनसाठी ५० कॉल होते, आता दररोज ५०० ते ६०० कॉल येत आहेत.
- परिस्थिती अशी आहे की, केवळ १० ते २० टक्के लोकांपर्यंत मदत पोहोचवू शकत आहोत.
ऑक्सिजनमॅनची सेवा कशी चालते?
- शाहनवाजजवळ सध्या २०० ऑक्सिजनचे ड्यूरा सिलिंडर आहेत. ज्यात ४० भाड्याचे आहेत.
- फोन करणाऱ्या गरजूला ते पहिले आपल्याकडे बोलावून ऑक्सिजन घेऊन जाण्यास सांगतात आणि जे सक्षम नसतात त्यांच्या घरी ते सिलिंडर पोहोचवतात.
- टीमचे लोक रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरचा वापर कसा करावा याविषयी सांगतात.
- वापर झाल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक वॉर रुमपर्यंत रिकामे सिलिंडर परत करतात.
- शाहनवाज यांनी आतापर्यंत चार हजारांपेक्षा जास्त लोकांना ऑक्सिजनची मदत केली.
पाहा व्हिडीओ: