मुक्तपीठ टीम
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा अचानक थांबल्याने २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या या अत्याधुनिक रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या टाकीच्या व्हॉल्व्हमध्ये गळती होत असूनही कुणाचे लक्ष गेले नाही. तेथे ऑक्सिजन टँकर आल्यानंतर गळती होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या २२ निरपराधांचे जीव दुर्लक्षामुळेच गेल्याचा आरोप होत आहे. त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक टाहो फोडताना करत आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
नाशिकच्या रुग्णालय मृत्यूकांड कसं घडलं?
- डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
- गळती झालेला ऑक्सिजन टँक हा १३ हजार किलोलीटर क्षमतेचा होता.
- त्या टाकीचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने तो बदलण्याचे काम सुरु होते.
- गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता.
- या रुग्णालयात एकूण १५० रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
- १३१ रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि इतर रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.
- २२ मृतांमध्ये ११ स्त्री आणि ११ पुरुष आहेत.
- ऑक्सिजन टाकीत गळती झाल्याने तो सभोतालच्या परिसरात पसरला होता.
- या मृत्यूकांडानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. शर्थीचे प्रयत्न करुन डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली गेली आहे.
- आता पुरवठा पूर्ववत झाला आहे.
- या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.
डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयचे शर्थीचे प्रयत्न
- ऑक्सिजन गळतीनंतर पुरवठा बंद झाल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपल्या डोळ्यांसमोर रुग्णांना तडफडताना पाहावे लागले
- आरोग्य रक्षकांनी काही रुग्णांना इतरत्र हलवण्याचा प्रयत्न केला.
- शक्य त्या मार्गाने इतर रुग्णांना वाचवण्यासाठीही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांचा नाइलाज झाला.
मुक्तपीठचे प्रश्न
- डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय हे कोरोना रुग्णालय आहे. त्यामुळे तेथे ऑक्सिजनची टाकी खूप महत्वाची. १३ हजार किलोलीटरच्या टाकीच्या देखभालीकडे दुर्लक्ष का झाले?
- अशा प्रकारची दुर्घटना, इतर काही तांत्रिक समस्या उद्भवू शकते, याची शक्यता लक्षात घेऊन अत्यावश्यक कक्षात पर्यायी व्यवस्था का नव्हती?
- मृत्यूकांडासाठी जबाबदार असलेल्यांच्या दुर्लक्षाच्या गुन्ह्याबद्दल कठोर कारवाई केली जाणार का?
- भविष्यात महाराष्ट्रात इतर कुठे असं घडू नये यासाठी सरकार आणि स्थानिक मनपा, मपा अशा प्रकारच्या पर्यायी उपाययोजना ठेवणार का?