मुक्तपीठ टीम
राज्यात रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. ज्या कंपनीच्या मालकासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले त्या कंपनीच्या संचालकांचा रेमडेसिविरच्या काळाबाजारात सक्रिय सहभाग असल्याचे उघड झाले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये ब्रुक फार्माच्या संचालकाला रेमडेसिविरच्या काळाबाजारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री त्याच कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात धावणे, आक्रमक विरोध करणे भाजपा नेत्यांना अडचणीचे ठरणार आहे.
रेमडेसिविरच्या काळ्याबाजारप्रकरणी दमणस्थित औषध कंपनीच्या तांत्रिक संचालक मनीष सिंह आणि वलसाड जिल्ह्यातील त्याचा सहकारी वरुण कुंद्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील वलसाडचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजदीपसिंग झाला म्हणाले की, वरुण कुंद्राचे फर्निचरचे दुकान आहे. झटपट फायदा कमवण्यासाठी त्याने रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु केला. त्याला ब्रुक फार्माचा संचालक मनिष सिंह इंजेक्शन पुरवत असे. या दोघांना १५ एप्रिल रोजी वलसाडच्या वापीमधून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनच्या १८ कुपी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
ब्रुक फार्माच्या मालकाच्या चौकशीमुळे मुंबई पोलिसांवर भाजपाचे आरोप
- शनिवारी रात्री मुंबई पोलिसांच्या चौकशीत ब्रूक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांनी माहिती दिली होती की त्यांच्या कंपनीकडून रेमडेसिविरची निर्यात केली जात होती. सध्या औषधाच्या निर्यातीवर बंदी आहे. त्यामुळे कंपनीकडे माल पडून आहे.
- दरेकर हे काही दिवसांपूर्वी आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत दमणमधील ब्रुक फार्माच्या कारखान्यात गेले होते.
- त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतातच देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात पोहचले.
- व्हायरल व्हिडीओप्रमाणे पोलिसांशी आक्रमकतेने वाद घालण्यात आला.
- मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला चौकशीनंतर सोडले.
- त्यावेळी त्याने पोलिसांना गुजरातमध्ये झालेल्या कारवाईची माहिती दिली नव्हती.
- पोलिसांनी पकडलेला वरुण कुंद्रा हा रेमडेसिविर इंजेक्शन अत्यंत महाग दराने विकत होता आणि त्याच्याकडे विक्रीचा परवानाही नव्हता.
- त्याला मुंबई पोलिसांनी चौकशी केलेल्या राजेश डोकानियांची ब्रुक फार्मा ही कंपनी रेमडेसिविर पुरवूच शकत नव्हती.
गुजरात पोलिसांनी कसे उघड केले रेमडेसिवीरचे रॅकेट
- वरुण कुंद्रा कोणत्याही परवान्याशिवाय रेमडेसिविर भरमसाठी किमतीने विकत असल्याची माहिती मिळताच वलसाड पोलिसांनी सापळा रचला.
- एका रुग्णाचे नातेवाईक सांगून एक पोलीस कुंद्राला भेटला.
- कुंद्रा १२ हजार रुपयांप्रमाणे रेमडेसिविरचे एक इंजेक्शन विकण्यास तयार झाला.
- कुंद्राने इंजेक्शनची कुपी दाखवताच दुसऱ्या पोलिसाने त्याला पकडले.
- आपला मित्र मनिष सिंहकडून रेमडेसिविर खरेदी केल्याचा दावा कुंद्राने केला.
- त्यानंतर पोलिसांनी मनिष सिंहला अटक केली, त्याने तो ब्रुक फार्माचा साचालक असल्याचे सांगितले.
ब्रूक फार्माकडे रेमडेसिविर इंजेक्शन तयार आणि निर्यात करण्याचा परवाना आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच अत्यावश्यक वस्तू कायद्याव्यतिरिक्तही आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स अॅक्टच्या इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.