मुक्तपीठ टीम
गडचिरोली म्हटलं की, नक्षलवाद्यांचा कहर आठवतो. गडचिरोली जिल्ह्यात पर्यटनाची कल्पना सहसा कोणाच्या मनात येत नाही. परंतु येथे ही काही अशी स्थळे आहेत ज्यांना भेट देताच पर्यटक थक्क होऊन जातील. गडचिरोली जिल्ह्यातल्या काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर कोणताही पर्यटक त्या स्थळांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. गडचिरोलीतल्या कमलापूरचा हत्ती कॅम्प हा अशाच पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर हे नाव ऐकताच अंगावर काटा येतो. कमलापूर हे ठिकाण नक्षलवादग्रस्त मानले जाते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५० किलोमीटर अंतरावर हा हत्ती कॅम्प आहे.
कमलापूरमध्ये असलेल्या वन विभागाच्या शासकीय हत्ती कॅम्प हा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. ते आकर्षण वाढतच चालले आहे. या कॅम्पमध्ये नऊ हत्ती आहेत. महाराष्ट्र राज्यातील हा एकमेव हत्ती कॅम्प आहे. हा हत्ती कॅम्प पाहण्यासाठी दिवसेंदिवस येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. वनविभागाने ५५ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात जंगलातील लाकडे वाहून नेण्यासाठी एक हत्तीण आणली होती. त्यानंतर एक हत्ती आणण्यात आला आणि त्यांची वंशावळ वाढत गेली. म्हणूनच हा हत्ती कॅम्प अस्तित्वात आला आहे. कमलापूर येथील वन विभागाच्या शासकीय हत्ती कॅम्प मध्ये मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, रूपा, सही आणि अर्जुन हे नऊ हत्ती आहेत. मागील काही वर्षापासून लाकडे वाहण्याचे काम कमी झाले आहे. पण या हत्तींना पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे.
वनविभागाच्या हत्ती कॅम्प परिसरात तीन डोंगर आहेत. या डोंगराच्या पायथ्याशी मोठा तलाव आहे. हिवाळ्याच्या दिवसात येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसते. धुक्यात हरविलेले डोंगरमाथे खूपच सुंदर दिसतात या ठिकाणी वनविभागाने १ कोटी ३६ लाख रुपये निधी जमा करून मूलभूत सुविधांचे काम सुरु केले होते. अर्धे काम पूर्ण झाले असतानाच २ डिसेंबर २०१९ रोजी नक्षलवाद्यांनी हत्ती कॅम्पला लक्ष करत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोडफोड केली. मात्र, तरीही पर्यटकांची संख्या काही कमी झाली नाही.
पाहा व्हिडीओ: