मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. बॉलिवूडही कोरोनानं त्रस्त झाले आहे ताजी बातमी अभिनेता अर्जुन रामपालला कोरोना झाल्याची आहे. मात्र सेलिब्रिटी प्रसिद्ध असल्याने त्यांना कोरोना झाला की बातम्या होतात. पण कामगार, तंत्रज्ञ असा मोठा वर्गही कोरोना संकटात जास्त सापडत असूनही त्यांची जास्त दखल घेतली जात नाही.
बॉलिवूडमध्ये कोरोनाने कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना करोनाची लागण झाली आहे. आता अभिनेता अर्जुन रामपाल हाही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. एकाच दिवसात एकूण ५ बॉलिवूड सेलिब्रेटींना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अर्जुन रामपालने ट्विटरवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली .
अर्जुन रामपालनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पण मला त्याआधी कोरोनाची कोणतीच लक्षणं जाणवली नाहीत पण खबरदारी म्हणून केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आली असून सध्या मी स्वतःला घरीच क्वारंटाइन केलं आहे आणि स्वतःची काळजी घेत आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहे. दरम्यान मागच्या १० दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वतःची टेस्ट करून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या ही वेळ खरंच खूप भीतीदायक आहे. पण आपण जागरुक राहणं गरजेचं आहे. काही काळ स्वतःची काळजी घेणं भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहे. आपल्याला एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागेल.’
— arjun rampal (@rampalarjun) April 17, 2021
अर्जुन रामपालच्या अगोदर शनिवार १७ एप्रिलच्या दिवसभरात ४ बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात नील नितिन मुकेश, सोनू सूद, मनीष मल्होत्रा आणि सुमित व्यास हे सगळे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेत. गेल्या काही दिवसांत अक्षय कुमार, गोविंदा, विकी कौशल, आमिर खान, कटरीना कैफ, भूमि पेडणेकर, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, परेश रावल, सतीश कौशिक, आशुतोष राणा यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनाही करोनाची लागण झाली आहे.
मात्र, चित्रपट सृष्टीत तांत्रिक विभागात काम करणाऱ्यांच्या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, सेलिब्रिटींना कोरोना ही बातमी होते, पण चित्रिकरण सुरु असताना किंवा अन्य ठिकाणी कोरोना बाधा झाल्यानंतर तंत्रज्ञ किंवा कामगारांकडे अपवाद वगळता कोणी लक्ष देत नाहीत.