भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून राज्य शासन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
या आगीत दुर्दैवाने मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकार प्रयत्न करेल”, असे मत मंत्री भुजबळ यांनी मांडले आहे.
दरम्याम, आग लागण्याची कारणे काय आहेत, हे तपासायची गरज आहे. अनेक रूग्णालये, नर्सिंग होम यांची फायर ऑडिट करण्याची गरज आहे. अनेक रूग्णालयांमध्ये वायरिंग वर्षोनुवर्षे बदलली नाही, त्यावरच रुग्णालयातल्या विविध मशीन चालत असतात. त्यामुळे ती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत रुग्णालयातील मधल्या परिचारीका आणि काही कर्मचाऱ्यांनी ७ बालकांना वाचवले आहे. त्या कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजे. पण दुर्दैवाने आपण १० बालकांना वाचवू शकलो नाही. त्या बालकांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी असल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.