मुक्तपीठ टीम
महाग असूनही अनेक कुटुंब मोठ्या नामांकित ब्रँडचेच दूध घेतात. एक विश्वास असतो. ते दूध दर्जेदार, भेसळमुक्त असेल असा. त्या कंपन्या तसे प्रयत्नही करतात. पण त्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहचतना त्या दुधात भेसळ होऊ शकते. त्यामुळे केवळ ब्रँडमुळे आंधळेपणाने वापर न करता दुधाची पिशवी आणि आतील दुधाचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दहिसरमध्ये छापा टाकून पोलिसांनी १२२ लिटर भेसळयुक्त दुधासह आरोपीला अटक केली आहे.
संभाजी नगर येथे एका खोलीत मोठ्या प्रमाणावर अमूल गोल्ड (फुल क्रिम) व अमूल (ताजा ) या दुधाच्या पिशव्यांमध्ये पाण्याची भेसळ करण्याचे काम चालत असे. तेथे पिशव्या कुशलतेने कात्रीने कापून दूध काही प्रमाणात बाहेर काढून त्यामध्ये मानवी सेवनास हानिकारक असे अस्वच्छ पाणी मिसळले जात असे. त्या दुधाच्या पिशव्या स्टोव्ह पिन व मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सिल करुन ते नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध आहे असे भासवून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात होती.
पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनालयातील अधिकाऱ्यांसोबत गुन्हे शाखेने छापा घातला. त्यावेळी विक्रीसाठी निघण्याच्या तयारीत असलेल्या सैदुल कावेरी या आरोपीला भेसळयुक्त दूध व दूध भेसळी करीता वापरण्यात आलेल्या साहित्यासह ताब्यात घेण्यात आले. नमुद इसमाकडे अंदाजे १२२ लिटर भेसळयुक्त दूध सापडले. ते जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या सैदुल नरसिंहा कावेरी या आरोपीविरुध्द दहिसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क. १७५ / २०२१ कलम २७२, ४८२, ४८३, ४२०, ४६८, ३४ भादवि सह कलम २६,२७,३ ( १ ) (झेडएक्स) अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास दहिसर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), एस विरेश प्रभु, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्र- उत्तर), पंढरीनाथ व्हावळ यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोउपनि. हरिष पोळ, पोलीस हवालदार शांताराम भुसारा, सुनिल बिडये, मंगेश तावडे, अरविंद म्हामुणकर, कल्पेश सावंत, राजेश सावंत, पोलीस नाईक शैलेश बिचकर, महिला पोलीस अंमलदार सुनिता भेकरे यांनी तसेच अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस. क्षीरसागर व पथक यांनी पार पाडलेली आहे.