मुक्तपीठ टीम
बँकेतून मोठी रक्कम ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या शनिवारच्या मध्य रात्रीपासून रविवार, १८ एप्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल १४ तास रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सेवा बंद असणार आहे. मात्र यादरम्यान, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) ही सेवा सुरळीतपणे सुरु राहणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंबंधित माहिती दिली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिलला सर्व कामकाज संपल्यानंतर आरटीजीएस सिस्टिमच्या क्षमतेला सुधारण्यासाठी आणि ‘डिजास्टर रिकव्हरी टाईम’ला सुलभ करण्यासाठी ही सेवा १४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र आरटीजीएस सेवा बंद असली तरी ग्राहकांना एनईएफटी सेवेचा लाभ घेता येणार आहे.
आरटीजीएस सेवा आहे तरी काय?
- भारतात २६ मार्च २००४ रोजी आरटीजीएस सेवेला सुरुवात झाली होती.
- रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सेवा ही पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वात वेगवान सेवा आहे.
- आरटीजीएस सेवेचा उपयोग मोठ्या रक्कमेसाठी म्हणजे २ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पाठवण्यासाठी केला जातो.
- जर काही कारणास्तव दुसऱ्या खात्यात पैसे पोचले नाहीत तर सर्व रक्कम आपल्या खात्यात परत पाठवली जाते.
- या सेवेचा वापर कोणताही खातेधारक करू शकतो.
कसा करतात वापर?
- सर्वसाधारणपणे बँकेतून पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया खूप वेळखावू आहे.
- पण विनाविलंब पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आरटीजीएस सेवाचा ग्राहक वापर करु शकतात.
- आरटीजीएसचा पर्याय निवडल्यास बेनिफिशरीचे (Beneficiary) बँक डिटेल अॅड करून जितकी रक्कम पाठवायची आहे तितकी रक्कम भरुन सबमिट केल्यास काही क्षणात पैसे ट्रान्सफर होतात.
- ही डिजिटल सेवा असल्यामुळे बँकेत जाण्याची गरज भासत नाही घर बसल्या आर्थिक व्यवहार सुलभपणे केला जातो.