मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर बारावीची परीक्षा पुढे ठकल्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या संदर्भात बैठक आयोजित केली होती. याबैठकीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय शिक्षण सचिव आदी अधिकारी उपस्थित असून हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी अनेक स्तरावरून होत होत्या.
पोखरियाल यांनी सांगितले की, सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा येत्या ४ मे ते १४ जून या कालावधीत होणार होत्या. मात्र त्या पुढे ढकल्यात आल्या आहेत. येत्या एक जून रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षेची तारीख निश्चित करण्यापूर्वी पंधरा दिवस विद्यार्थ्यांना सुचित केले जाणार आहे.
पंतप्रधानांसमवेत आज झालेल्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबरोबरच सीबीएसई बोर्डामार्फतच मूल्यांकनाचे मापदंड तयार करण्यात येणार आहेत, त्या आधारे सीबीएसई दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे.
परीक्षा रद्द / पुढे ढकलण्याची मागणी
देशभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वभूमीवर अनेक राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. हे निर्बंध लक्षात घेता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा स्थगित करण्याची किंवा रद्द करण्याची मागणी वाढत होती. महाराष्ट्रासह काही राज्यांनी दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली मागणी
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील दहावी, अकरावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मंगळवारी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात आणि अंतर्गत मूल्यांकन किंवा ऑनलाइन परीक्षेतून त्याचे मूल्यांकन करून निकाल जाहीर करावा अशी मागणी केली. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही केंद्र सरकार आणि सीबीएसईकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
खा. अरविंद सावंत यांनी केली होती देशातील सर्वच बोर्डांच्या परीक्षांसाठी समान निर्णय घेण्याची मागणी
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी देशातील सर्व बोर्डांच्या दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात धोरण आखून समान निर्णय घेण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून खासदार सावंत यांनी ही मागणी केली आहे. देशात सीबीएसई, आयसीएसई तसेच एसएससी प्रमाणे राज्य पातळीवरील विविध बोर्ड असल्यामुळे एकसमान निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली होती.
पूर्ण बातमी वाचा:
“देशातील सर्वच बोर्डांच्या परीक्षांसाठी समान निर्णय घेण्याची मागणी”