तुळशीदास भोईटे
कोरोना संकटात खूप काही नव्यानं कळतंय. खुपतंयही. जीवनातील सारं सौंदर्य विसरवत, विखाराची वावटळ उठवत, नकारात्मकतेचा अंधार माजवू पाहणाऱ्या अपप्रवृत्ती कोरोनापेक्षाही जास्त वेगानं फोफावताना दिसत आहेत. त्यामुळेच किमान मुक्तपीठ या आपल्या हक्काच्या मुक्तमाध्यमात सकारात्मकतेवर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता यापुढील काळात “चांगल्या बातम्या-चांगले विचार…सर्व उपयोगी असंच!” या धोरणानुसार पुढील वाटचाल केली जाणार आहे.
सभोताली जे काही घडते ते मिनिटालाही तर सेकंदाला प्रस्थापित माध्यमांमधून मिळत आहे. त्यामुळे ते पुन्हा देण्यापेक्षा, रोजच्या त्याच त्याच घडामोडी न देता चांगल्या, वेगळ्या बातम्यांवर भर असेल. याचा अर्थ असाही नाही की अगदीच जगाकडे, राजकारण, गुन्हेगारीकडे पाठ फिरवणार. त्याची दखल घेतली जाईलच. पण ते बातमीपेक्षा भूमिका मांडणाऱ्या विचारांच्या, विश्लेषणाच्या माध्यमातून असेल. कोणतीही विशिष्ट विचारांध भूमिका न घेता गेले तीन महिने जसे सरळस्पष्ट भाष्य केले गेले, व्हा अभिव्यक्तच्या माध्यमातून प्रत्येक विचारांना अभिव्यक्त होता आलं. ते तसंच सुरु असेल. त्यात बदल नसेल. उलट ते प्रमाण वाढवले जाईल. आंदोलन, अन्याय यांच्यासाठी व्हा अभिव्यक्त आणि सरळस्पष्टच्या माध्यमातून आवाज उठवला जाईलच जाईल.
चांगल्या बातम्या लोकांच्या पसंतीस उतरणाऱ्या आहेत. एक छोटा का होईना त्यांचा वर्ग तयार होत आहे. सकारात्मकतेचा सुगंध दरवळू लागला आहे. तो अधिक वाढवला जाईल. लोकांच्या उपयोगी असणाऱ्या माहितीपूर्ण, आरोग्य, तंत्रज्ञान, रोजगार, उद्योग, शिक्षण, कायदा, कला, क्रीडा, साहित्य या विषयांच्या उपयोगी बातम्यांवर, उपयोगी माहितीवर जास्त भर दिला जाईल.
त्यामुळेच आता रोजच्या घडामोडींसाठी नाही तर “चांगल्या बातम्या, चांगले विचार…सारं उपयोगी असं!” याच धोरणानुसार मुक्तपीठची वाटचाल असेल. अर्थाच सरळस्पष्ट अभिव्यक्त होत राहूनच!
साथ असू द्या!
(तुळशीदास भोईटे हे www.muktpeeth.com या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)