मुक्तपीट टीम
अगदी चित्रपटात दाखवतात तसाच प्रकार पुण्याच्या शिरूरमध्ये घडला आहे. पुण्यातील एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले होते. धक्कादायक बाब म्हणजे २२ बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. कोरोना संकटाचा फायदा घेत या मुन्नाभाई एमबीबीएसने त्याच्या रुग्णालयातही कोरोना उपचार सुरु केले होते.
नांदेडचा कंपाऊंडर ते पुण्यात डॉक्टर!
• संबंधित बोगस डॉक्टरचे नाव महमूद शेख असं आहे.
• तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
• नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कपांऊडर म्हणून काम करायचा.
• काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत.
• त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मोरया मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केलं.
• त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदललं.
• महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरू केला.
आडनाव पाटील…फोनवर फुफा…अब्बू…अम्मी! झालं बोगसगिरीचं निदान!!
काही दिवसांपूर्वी तिथल्या स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. जेव्हा बोगस डॉक्टरला त्याच्या कुटुंबियांचा फोन येत असे तेव्हा तो त्यांच्याशी हिंदी भाषेत संभाषण करायचा. फोनवर बोलताना तो फूफा, अम्मी, अब्बू असे शब्दप्रयोग करायचा. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समोर आलं. त्याच्याकडे एमबीबीएस डिग्री असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर डॉ. महेश पाटील याचं मूळ नाव मेहबूब शेख असून, तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.