मुक्तपीठ टीम
पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला. ते म्हणाले, “आघाडीच्या शिशुपालाचे शंभर अपराध भरलेत. शंभर अपराध भरल्यानंतर पहिली संधी पंढरपूरकरांना मिळालेली आहे. समाधान आवताडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिला , तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केलाच म्हणून समजा.” करेक्ट कार्यक्रम म्हणजे फडणवीसांनी दिलेला सत्ताबदलाचा सूचक इशारा मानला जात आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुणाळी आता शिगेला पोहोचलीय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. प्रचारसभेत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात महाविसार आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.
राज्यातील सरकार हे तर बेईमानेने तयार झालेले आहे . सरकारमध्ये आले तेव्हा बांधावर जावून सांगायचे ५० हजार देऊ. पण २ हजार रुपयेही दिले नाहीत. कर्जमाफी करु म्हणले, पण कोणतीही कर्जमाफी केली नाही. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुकानदार अडचणीत आहेत. शेजारील राज्यांनी पॅकेज दिले. मात्र, देशातील सर्वात समृद्ध राज्य असूनही सरकारने आमच्या जनतेला फुटकी कवडीही दिली नाही. सुलतानी, मोगली वसुली मात्र या सरकारने सुरू केली.
या सरकारने वीज कापणार नाही असं आश्वासन अधिवेशनाच्या सुरुवातीला दिलं. अधिवेशन सुरू झाल्यानंतर या सरकारने लगेचच वीज तोडणी सुरू केली. एखाद्या गावात पाच लोकांनी वीज बिल भरलं नाही तर त्या गावचा ट्रान्सफार्मर काढला जात असून गावांना अंधारात लोटलं जात आहे. त्यामुळे आज पंढरपूरच्या विकासाचं आश्वासन देणाऱ्या या सरकारला भुलून जाऊ नका. ठाकरे सरकार केवळ लबाड सरकारच नाही तर महावसुली सरकार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
पाहा व्हिडीओ-