तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
आता राजकारण बस झालं. ते सामान्यांसाठी मरणकारण ठरतंय. महाराष्ट्रातील सत्ताधारी असो की केंद्रातील. प्रत्येक पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आता राजकारण थांबवावे. पक्ष कोणताही असो. नेता कोणताही असो. सर्वांना एकच सांगणं. मतदारांचा माणूस म्हणूनही विचार करावा. ते जगलेत तर तुमचे मतदार राहतील. तरच तुमच्या सत्तेचे इमले सजतील. त्यांच्या अर्थी उठवून तुम्ही सत्तेचे स्वप्न पाहू शकणार नाही. कदाचित तुमच्या या विखारी सत्ता वासनांनी तुमचाच घात होईल. तुमच्या राजकारणाच्याच तिरड्या उठतील. याची सर्वांनीच जाण ठेवावी.
आज महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांची विधाने ऐकली.
एकाने म्हटले, “महाराष्ट्रात लोकशाही नाही लॉकशाही आहे. कोरोना रोखायला जमत नाही म्हणून हे सरकार उठसूट लॉकडाऊन करते.”
दुसऱ्याने म्हटले, “लॉकडाऊन नाही लावला, परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल!”
पत्रकार असलो तरी एक सामान्य म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. दोन मोठ्या नेत्यांची दोन विधाने ऐकून डोक्यात संभ्रम निर्माण झाला. नेमकं खरं काय?
राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या प्रचारसभेत केलेले भाषण एकप्रकारे लॉकडाऊन हे चुकीचे असल्याची मांडणी करणारे.
त्यानंतर ते म्हणाले, “कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे.”
आता महाराष्ट्राचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी दिलेला इशारा पाहा, “गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल”
फडणवीस भाषणात म्हणाले, “देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच उठसूठ लॉकडाऊन केला जात आहे. महाराष्ट्रात लोकशाही नसून लॉकशाही आहे.”
एक नेता राज्यात लोकशाही नाही तर लॉकशाही सांगतो तेव्हा स्वाभाविकच लॉकडाऊन चुकीचे असल्याचे मनात येते. भले त्यांनी नंतर लोकांना पॅकेज देऊन लॉकडाऊन चालेल, असा सूर लावला असला तरी. त्यांचीही लॉकडाऊनला मान्यता असेल जर त्यांनी सांगितलेल्या अटी, शर्थी पाळल्या गेल्या तर. त्या पाळणे तेवढे सोपे नाही, कदाचित सरसकट तसे पॅकेज प्रत्येकाला देणे हे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनाही माहित असावेच. तरीही ते म्हणतात तेव्हा नक्कीच लोककारणापेक्षा राजकारणाचा वास येतो.
मलाही वाटते लॉकडाऊन करताना सामान्यच नाही मध्यमवर्गियही जगतील कसा याचा विचार झालाच पाहिजे. पण त्यासाठी प्रत्येकाला पॅकेज देणे कमी लोकसंख्येच्या पाश्चात्य देशांसारखे आपल्याकडे सोपे नाही. नाही तर मोदी सरकारनेही दिले असते. त्यापेक्षा प्रत्येकाला सन्मानाने कसे जगवता येईल, याचा सरकार, विरोधक आणि समाजानेही विचार केला पाहिजे. तशी व्यवस्था केलीच पाहिजे. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर तसेच घडेल असे वाटलेले. मला वाटते त्यासाठीच तडका-फडकी लॉकडाऊन न लावता थोडा वेळ घेतला जात आहे.
वडेट्टीवार जेव्हा सांगतात. लॉकडाऊन झालेच पाहिजे. तेही मुख्यमंत्री सांगतात तसे कमी दिवसांचे नाही तर तीन आठवड्यांचे. तर आणि तरच लोक वाचतील. नाही तर परिस्थिती चिघळेल आणि मृतदेहांचे खच पडतील. तेव्हा प्रश्न हाच मनात येतो, पहिल्या लाटेनंतरच्या काळात काय तयारी केली साहेब तुम्ही? मान्य खाटा, साधने मिळतील आरोग्य कर्मचारी कुठून आणणार? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बोलले. पण जे आहेत त्यांची काय अवस्था केलीत तुम्ही. तुमच्याच किमान वेतन कायद्याचा भंग करून तुम्ही ज्या आरोग्य सेवकांना राबवता त्यांना माणूस म्हणून जगता येईल असे वेतन देऊन सेवेत सामावले असते तर कसा काय मनुष्यबळाचा अभाव जाणवला असता? कंत्राटी कर्मचारी म्हणून ज्या गुणवंतांना तुम्ही राबवता, ज्यांच्या जीवार तुमच्या आरोग्य सेवेची धडधड बऱ्यापैकी चालते, त्यांची काय स्थिती आहे? कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनाशिवाय कसलीच आर्थिक, इतर सुरक्षा कधीच का दिली नाही. किमान कोरोना संकटात तरी का तसे केले नाही? सत्तेत कोणीही असले तरी ही अनास्था कायम असते. त्यामुळेच लोक सरकारी सेवेपासून दूर राहिले, असेही होत असावे. गरज सरो वैद्य मरो, केल्याचाही फटका बसतो आहेच ना.
विरोधी पक्षांचे काय सांगावे! ते तर विसरतात की आज ते विरोधात असले तरी नंतर कधीतरी सत्तेतही येतीलच. आणि राज्यात नाही तर केंद्रात आहेतच ना! काय दिले हो जेव्हा तुमच्या सरकारने लॉकडाऊन लावला तेव्हा? लाखो कोटींचे पॅकेज ऐकले, मिळाले कुणाला? शेतकरी सन्मान निधी सांगू नका तो फक्त कोरोनासाठी नव्हता. नाही! जे शक्य तेच बोला. नंतर तो तर जुमला होतो हे बोलणे तुमच्यासाठी सोपे असेल, पण सामान्यांचा घात करणारा ठरेल.
माझ्यासारख्यांनाही व्यावसायिकदृष्ट्या लॉकडाऊन नकोसेच वाटते. पण संसर्ग साखळी तोडण्यासाठी दुसरा उपाय दिसत नसताना उगाच विरोध योग्य वाटत नाही. ज्यांना लॉकडाऊन नको वाटते, अशा मान्यवरांनी लॉकडाऊनला पर्यायी उपाययोजना सुचवलीच पाहिजे. आपल्याकडे तसे दिसत नाही.
सर्वाचं केंद्रीकरण करून ठेवायचं. सर्व केंद्राच्याच हाती ठेवण्याचा अट्टाहास ठेवायचा. लसींमध्येही भेदभाव करायचा. साधा महाराष्ट्रात कोरोनाची कोणती स्ट्रेन आहे ते रिपोर्ट वेळेत द्यायचे नाहीत. आरोग्य मंत्री बोलले तर त्यांना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी एखाद्या पंचायत समिती सभापतीच्या स्टायलीत झापायचं. आणि पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कसे जास्त त्यावर राजकारण करायचे!
भाजपाचे असे पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तरी काय वेगळे चाललंय? त्यांच्यातीलही अपवाद वगळता सर्वच राजकारणातच गुंतलेले दिसतात.
मला वाटतं भाजपाची रणनीती असते इतरांना वादात गुंतवून ठेवण्याची. भाजपेतर पक्ष, नेते, विचारवंत, पत्रकार सर्वांचा खूपच वेळ भाजपावर जातो. खरंतर कोरोनाने त्यांचे सर्वच दावे उघडे पाडलेत.
गुजरात, मप्र, उप्र स्थितीविषयी खोटारडेपणाविषयीही अति झाल्यानं का होईना पण स्थानिक माध्यमं माहिती उघड करू लागलीत.
त्यामुळे ते सर्व सोडावं आता.
मला वाटतं आता आपण कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेचा आपल्या महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचं सक्षमीकरण करण्यासाठी संधी म्हणून विचार केला पाहिजे, असे वाटते.
धुळ्यात कचरागाडीतून मृतदेह, पुण्यात रेमडेसिविरसाठी आकांत, बारामतीत रुग्ण वाढल्याने खुर्चीवर बसवून उपचार, नागपुरात रुग्णालय तोडफोड, चंद्रपुरात रुग्ण रस्त्यावर, किनवटला कोरोना केंद्रात भयानक अनास्थेचा कारभार. ठाण्यात ऑक्सिजन संपल्याने दुसरीकडे हलवावे लागणे हे माध्यमांमध्ये जे दिसत आहे ते चांगले चित्र नाही. कोरोना महामारीची साथ आहे, रुग्ण संख्या प्रचंड आहे. पण तयारी नव्हतीच हेही खरंय.
हे बदलण्यासाठी सत्तेत असताना कोणीही काही केले नाही. आता कोरोनाने सर्व उघडे पडत आहेत. त्यामुळेच संकटाला संधी मानत नेमके काय बदल केले पाहिजेत, यावर सर्वच मान्यवरांनी राजकारणविरहित भूमिका घेत सूचना करणे, कृती करणे आवश्यक आहे.
तुमच्याही काही सूचना असतील तर तुम्ही मुक्तपीठकडे पाठवा. कृपया शक्य झालं तर प्रत्येकाने अनुभवातून, इतरांशी होणाऱ्या देवाण-घेवाणीतून मिळालेली माहितीही मांडा. आपण एकत्र करु. प्रयत्न करु. लॉकडाऊन नको तर कोरोना रोखायचा कसा सांगा तरी!
आता राजकारण बस झालं. ते सामान्यांसाठी मरणकारण ठरतंय. महाराष्ट्रातील सत्ताधारी असो की केंद्रातील. प्रत्येक पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आता राजकारण थांबवावे. पक्ष कोणताही असो. नेता कोणताही असो. सर्वांना एकच सांगणं. मतदारांचा माणूस म्हणूनही विचार करावा. ते जगलेत तर तुमचे मतदार राहतील. तरच तुमच्या सत्तेचे इमले सजतील. त्यांच्या अर्थी उठवून तुम्ही सत्तेचे स्वप्न पाहू शकणार नाही. कदाचित तुमच्या या विखारी सत्ता वासनांनी तुमचाच घात होईल. तुमच्या राजकारणाच्याच तिरड्या उठतील. याची सर्वांनीच जाण ठेवावी.
तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite