मुक्तपीठ टीम
रेमडेसिवीर इंजेक्शन या गुणकारी कोरोना औषधांचा मोठ्या प्रमाणवर तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास होत आहे. तरीही दुसरीकडे कोरोना सेंटरमधूनच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी ठाण्यातून दोघांना अटक करत त्यांच्याकडून २१ इंजेक्शन जप्त केली आहेत. यापैकी प्रत्येक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकले जाणार होते. अशा परिस्थितीत कुंपनच शेत खातं असल्याचं दिसून आलं आहे.
आतीफ फिरोग अंजुम, प्रमोद सखाराम ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फिर्यादी कैलाश दशरथ खापेकर यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार वागळे इस्टेट पोलिसांनी कलम ४२०, ३४ परिच्छेद २६ औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह कलम 3(२)(क) जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९९५ चे उल्लंघन आणि कलम ७(१)(अ)(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे शहरात काही व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शनची बाजारभावापेक्षा जास्त किंमतीत विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने ठाणे खंडणी विरोधी पथकाने आरोपींना पकडण्यासाठी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून व्यूहरचना आखली. शनिवारी ठाण्यातील तीन हातनाका येथून ५ ते १० हजार रुपये किमतीमध्ये इंजेक्शनची विक्री करताना आतीफला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून १६ इंजेक्शन जप्त करण्यात आली. त्यानंतर बाळकुम नाका येथून प्रमोदच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यालाही पाच इंजेक्शनसह रंगेहात पकडण्यात आले. अशा प्रकारे या आरोपींकडून २१ इंजेक्शन, मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
आतिफ हा मुलुंड येथील एका नर्सिंग होममध्ये ब्रदर म्हणून काम करत असून त्याच्याकडे मिळालेल्या १६ इंजेक्शनवर ‘नॉट फॉर सेल’ असं लिहिले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार उघडकीस आणण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे खंडणी विरोधी पथकाने केली आहे.