मुक्तपीठ टीम
मध्यप्रदेशात कोरोनाचे खरे आकडे लपवले जात असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाच्याच आमदाराने केला आहे. कागदावरील आकडे आणि प्रत्यक्षातील वास्तव यात फरक असल्याचे आमदार अजय विश्नोई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. कोरोनामुळे १४ मृत्यू झाले पण केवळ दोनच लोकांची नोंद झाली. मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांनी रोखताच आमदारांनी त्यांनाही बोलू देत नसल्याबद्दल सुनावले.
अनियंत्रित कोरोना रोखण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व ५२ जिल्ह्यांशी संवाद साधला. जबलपूरच्या आढावा घेताना बैठक चांगलीच रंगली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये भाजपाचे आमदार अशोक रोहानी, सुशील तिवारी, अजय विश्नोई, कॉंग्रेसचे आमदार विनय सक्सेना, डॉ. जितेंद्र जामदार, जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा आणि अन्य लोकप्रतिनिधी सहभागी होते. जबलपूरचा नंबर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी तेथिल कोरोना संसर्गाचा आढावा सुरु केला. आमदार विनय सक्सेना म्हणाले की, जबलपुरात कोरोना रोखण्यासाठी केलेली व्यवस्था अपुरी आहे. रुग्णालयात बेड नसतात, लसीसाठी लोकांना तासनतास थांबावे लागते. रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात आहे. या प्रकरणात जबलपूरमधील परिस्थिती गंभीर बनल्याचे सांगत आमदार अजय विश्नोई यांनीही कॉंग्रेसच्या आमदाराचे समर्थन केले. मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत. रुग्णांना रेमेदेसिवीर इंजेक्शन १४ हजार रुपयांमध्ये खरेदी करावे लागत आहे, अशा तक्रारीही त्यांनी मांडल्या.
चर्चा तापू लागताच शेवटी मुख्यमंत्र्यांनी गुंडाळण्याचा प्रयत्न केला. आपल्याला केवळ एकाच जिल्ह्याचे बघायचे नाही तर ५२ जिल्ह्यांबद्दल बोलायचे आहे, असे सांगत त्यांनी जबलपूरची चर्चा आवरती घेतली. त्यामुळे आमदार विश्नोई म्हणाले की, जर सत्य नाही ऐकायचे तर मी गप्प बसतो. शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोनातील मृत्यूच्या आकडेवारीवरून सरकार दिशाभूल करत आहे. कोणाला तरी सत्य सांगावे लागणारच.