मुक्तपीठ टीम
संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे. त्यामुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मुलांचे भविष्य आणि आयुष्य याची चिंता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी देशातील सर्व बोर्डांच्या दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात धोरण आखून समान निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहून खासदार सावंत यांनी ही मागणी केली आहे. देशात सीबीएसई, आयसीएसई तसेच एसएससी प्रमाणे राज्य पातळीवरील विविध बोर्ड असल्यामुळे एकसमान निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे, जेणेकरून भिन्न राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा प्रावधान किंवा संधीबद्दलचा कोणताही भेदभाव होणार नाही.
कोणत्याही राज्याच्या एकतर्फी निर्णयापेक्षा राष्ट्रीय पातळीवर एकमत होण्याच्या महत्त्वासह देशभरातील आगामी परीक्षांच्या बाबतीत मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून स्पष्ट संवाद होण्याच्या आवश्यकतेबद्दल देखील त्यांनी पत्रात नमुद केले आहे.