मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्याला तसेच पुण्याला भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती. राज्य संकटात असताना जावेडकर मात्र त्यांचे कर्तव्य न बजावता राज्य सरकारचा राजीनामा मागत आहेत, हे ढोंगी राजकारण असल्याची टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
जावडेकरांचा समाचार घेताना मोहन जोशी म्हणाले की, राज्य सरकारची कोंडी करून मविआ सरकारला अपयशी ठरविण्याचा भाजप नेत्यांचा कुटील डाव आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची वक्तव्ये हा त्याच डावाचा एक भाग आहे. प्रकाश जावडेकर हे पुण्याचे रहिवासी आहेत, पुण्यात भाजपचे खासदार, चार आमदार, शंभर नगरसेवक आहेत. यांच्यामार्फत जावडेकर यांनी पुण्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करायला हवी होती. केंद्र सरकारकडून ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, कोरोना लस, रेमडेसिवीरच्या सुविधा पुरवायला हव्या होत्या. पुण्यात कोविड साथीने थैमान मांडले असताना जावडेकर यांनी याचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत होईल याची दक्षता घ्यायला हवी होती. हे न करता जावडेकर राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी करतात यामागे भाजपाचा कुटील डाव आहे.
पुण्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अशा गंभीरवेळी गर्दी टाळणे हा उपाय असताना भाजप नेत्यांना त्याचे भान राहिलेला नाही. सरकार विरोधात आंदोलन करण्याच्या नावाखाली भाजपाने रस्त्यावर गर्दी जमवून आंदोलने करण्याची गरज नव्हती. सध्याची परिस्थिती पाहता साथीच्या तडाख्यापासून लोकांचे बचाव करणे, जीव वाचविणे गरजेचे आहे. सध्याची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन भाजपच्या नेत्यांनी राजकारण बाजून ठेवून या महामारीवर मात करण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मोहन जोशी यांनी केले आहे.