मुक्तपीठ टीम
जागतिक पातळीवर नावजल्या जाणाऱ्या टाईम मॅगझिनमध्ये लेख, छायाचित्र येणं अनेकांसाठी स्वप्नवत असतं. मोठ-मोठे नेते, उद्योगपती, कलाकार त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी झुरतात. त्याच टाइम मॅगझिनमध्ये आपल्या वर्ध्याच्या पवनार इथल्या आशावर्कर अर्चना घुगरे झळकल्यात. आपली एक गावकरी आशावर्क जागतिक मासिकात झळकल्यानं पवनारच्या गावकऱ्यांचा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झालाय.
पवनार इथल्या अर्चना रामदास घुगरे या आशा वर्कर आहेत. कोरोनासंकटात प्रत्येक जण सुरक्षित वातावरण शोधत असताना पोलीस, महसूल विभागासोबतच आशावर्करनी मोलाची कामगिरी बजावली. फ्रंटलाईन वर्कर म्हणून आशावर्कर कार्यरत असतात. आरोग्य यंत्रणेचा भाग म्हणून आशा वर्करनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. पती, दोन मुली असं कुटुंब असलेल्या अर्चना घुगरे यांना कोरोना काळात फिल्डवर जावं लागतं होतं. कौटुंबिक जबाबदारी सांभाळतनाही आशा वर्कर म्हणून त्यांनी केलेलं काम खूप महत्वाचे आहे.
अल्प मानधन, काम डोंगराएवढं!
• खरेतर आशावर्कना मिळणारे मानधन हे लाज वाटावी असेच असते.
• त्यांना महिन्याला फक्त दीड हजार मिळतात.
• आशा वर्करनी दीड हजार रुपयांच्या अल्प मानधनात त्यांनी संकट काळात कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी संघर्ष केला आहे.
• तोकड्या सुविधा, बरेचदा अनेकांकडून होणारा विरोध, प्रतिकूल वातावरणातही त्यांनी जबाबदा-य सांभाळल्या आहेत.
• नागरिकांची माहिती घेणं, जनजागृती करणं, शासनाच्या नियमांची माहिती देण, सर्वेक्षण करणे आदी जबाबदा-या पार पाडल्यात.
• आताही आशावर्कर त्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
• गृहभेटी देणं, कोरोनाचा रुग्ण निघाल्यास कन्टेन्मेंट झोन परिसरात सर्वेक्षण करणं अशा जबाबदाऱ्या आहेत.
• सरकारकडून येणाऱ्या सुचनांवर अनुषंगानं काम करावे लागते.
नोव्हेंबर महिन्यात टाईम मॅगझिनच्या पत्रकार अवंतिका यांनी आशा वर्कर म्हणून अर्चना घुगरे यांच्याकडून माहिती घेतली. अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्कर्सवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी माहिती घेतली, त्यांचे काही व्हिडीओ मागविलेत. अर्चना यांच्या व्हिडीओ, माहितीला सर्वाधिक पसंती मिळाली आणि टाईम मॅगझिनमध्ये त्या सचित्र झळकल्यात.
अर्चना घुगरे यांनी दिलेली माहिती, त्यांचं मत त्यांच्या छायाचित्रांसह मॅगझिनमध्ये आल्यानं गावातही आनंद व्यक्त होतोय. त्यांचं अभिनंदन केले जात आहे. त्यांचे सत्कार होत राहतील. पण टाइम मॅगझिननेही दखल घेतलेल्या आशावर्करच्या सेवाभावाची दखल आपले सरकार कधी घेणार? कधी त्यांना मिळणारे धन खऱ्या अर्थाने मान देणारे ठरेल?
पाहा व्हिडीओ: