मुक्तपीठ टीम
देशात सर्वाधिक लसीकरण मुंबईसह महाराष्ट्रात सुरु असतानाच लसीचा साठा संपत आल्याची बातमी आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनीच हे वास्तव उघड केले आहे. त्यांनी संतापाने केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे, “सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ‘वरवर माया आणि पोटभर जेव ग बया’ असं केंद्र सरकारचं सुरू आहे. आम्ही जर लसीकरण करायचंय तर आम्हाला मिळायला तर पाहिजे ना.. आम्ही सगळे नियम पाळतो आहोत. राज्य सरकाराने केंद्राला पत्र ही पाठवलं तरी आम्हाला लस मिळत नाही”
राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात मुंबई देखील मागे नाही. मात्र, अशास्थितीत मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत पुढील २ ते ३ दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. “मुंबईत सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे मिळून १ लाख ८५ हजार डोस शिल्लक आहेत. तसेच मुंबईला मिळणारा पुढचा लसींचा साठा हा १५ एप्रिलनंतर मिळणार आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो”, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील लस आणि लसीकरण वास्तव आकड्यांमध्ये पुढीलप्रमाणे आहे:
मुंबईत लस-लसीकरण आकड्यांमध्ये
• मुंबईत दररोज ५० हजार व्यक्तींना लसीचे डोस
• जम्बो कोरोना सेंटर्समध्ये दिवसाला दीड ते दोन हजार लसींचे डोस
• मुंबईत कोव्हिशिल्ड लसींचे एकूण १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत.
• त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिन लसींचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत.
• येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण होणार आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्रावर साधला निशाणा
महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत राज्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याची टीका केली आहे. मुंबईत उपलब्ध असलेला लसींचा साठा “येत्या २ ते ३ दिवसांत पुरेल घतकाच आहे. पुढचा लसींचा साठा १५ तारखेनंतर येणार आहे. मग तोपर्यंत आम्ही काय करायचं? सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असं केंद्र सरकारचं सुरू आहे. आम्ही जर लसीकरण करायचंय तर आम्हाला मिळायला तर पाहिजे ना.. आम्ही सगळे नियम पाळतो आहोत. राज्य सरकाराने केंद्राला पत्र ही पाठवलं तरी आम्हाला लस मिळत नाही”, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केलीय.
लसीचा तुटवडा नसल्याचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी जरी लसींचा साठा अपुरा असल्याचे उघड केले असले, तरी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मात्र देशाच्या कोणत्याही भागात करोना लसींचा तुटवडा नसल्याचं दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.