मुक्तपीठ टीम
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे आज गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देत देशमुखांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एका महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याला लक्ष्य केले आहे. ते आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले किरीट सोमय्या ?
“अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले अनिल परबही जातील. पुढे पुढे पहा या मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री घरी जाणार आहेत,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
याआधीही किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूवरून अनेक आरोप केले होते. या प्रकरणावरून राठोड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. विरोध वाढल्यामुळे तेव्हा संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर त्यांचासुद्धा राजीनामा घेण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. आता सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचा उल्लेख करुन तेसुद्धा लवकरच जातील असे खळबळजनक वक्तव्य केले आहे.