मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई उच्च न्यायालाने मंजुरी दिली असल्यामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना सांगितले असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
राजीनाम्यात काय म्हटले?
“मुंबई उच्च न्यायालयाने अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशानुसार त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब, मला मंत्री (गृह) या पक्षावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती”, असं अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021
परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी एका अधिकाऱ्याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले असल्याचे म्हटले होते. मात्र, सचिन वाझे प्रकरणात सिंह यांनी केलेल्या आरोप बदलीच्या निराशेतून केल्याची भूमिका सरकारने घेतली होती. तसेच दबावाखाली हे आरोप केल्याचे बोलले जात होते. त्यानंतर परमबीर यांनी सर्वाच्च न्यायलयात धाव घेत आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सीबीआय चौकशीचे निर्देश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आता गृहमंत्री पद शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाणाची चर्चा सर्वत्र रंगत आहे.