मुक्तपीठ टीम
छत्तीसगडमध्ये सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी पूर्ण तयारीसह हल्ला केला. नक्षलवादी एलएमजीसारख्या शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. तसेच त्यांनी रॉकेट लाँचरचाही वापर केला. या चकमकीत सुरक्षा दलाचे कमीतकमी २२ जवान शहीद झाले आहेत, तर ३० इतर जखमी झाले आहेत. पण जखमी जवानांकडून आता सीआयएसएफ जवानांच्या शौर्याची माहिती मिळत आहे. नक्षलवाद्यांकडून ’यू’ आकारात वेढण्यात आले आणि त्यानंतर अचानक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह हल्ला करण्यात आला. तरीही झाडांची ढाल करत अखेरच्या श्वासापर्यंत जवानांनी नक्षलवाद्यांशी निकराची झुंज दिली. मात्र, रॉकेट लाँचरचा आणि अन्य स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवले गेले.
चकमकीत नक्षलवाद्यांचाही खात्मा
सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग म्हणाले की, ठार नक्षलवाद्यांची संख्या २५-३० पेक्षा कमी नसावी. सूत्रांनी सांगितले की, विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेच्या आसपासच्या भागात नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे सुरक्षा दलाच्या १,५०० जवानांच्या पथकाने दुपारनंतर शोधमोहीम राबविली. सुरक्षा दलाच्या तुकडीत सीआरपीएफच्या स्पेशल कोब्रा युनिटचे कर्मचारी आणि नियमित बटालियनमधील काही पथके होते. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक म्हणजेच डीआरजी आणि छत्तीसगड पोलिसांशी संबंधित इतर जवान सहभागी झाले होते.
नक्षलवाद्यांनी स्वत:ला सोयीच्या जंगलात जवानांना ओढले
गर्द झाडांचे हे जंगल नक्षलवाद्यांच्या बटालियनचे घातपाती क्षेत्र आहे. या बटालियनचे नेतृत्व नक्षलवादी माडवी हिडमा करीत आहेत. हिडमा या भागात असल्याची माहिती मिळताच जवानांनी सर्च ऑपरेशनवर पाठविण्यात आले होते. पण त्याची माहिती मिळताच नक्षलवादी जाळं पसरून बसले होते. विजापूर जिल्ह्यातील ताररेम पोलिस स्टेशनमार्फत शनिवारी साडे अकराच्या सुमारास टेकलागुडा गावातून शंभर मीटर अंतरावर सैन्य पोहोचले, तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला. जखमी जवानांनी गावाकडे धाव घेतली, पण तेथेही नक्षलवादी दबा धरून बसले होते. सुमारे सहा तासात घटनास्थळी तीन चकमकी घडल्या. दुपारी साडेतीन वाजता गावात दुसरी चकमकी घडली आणि त्या चकमकीत सर्वाधिक नुकसान झाले.
गावातही दबा धरून बसले होते नक्षलवादी
गावात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जखमी जवानांवर गोळीबार केला. सैनिक अचानक होत असलेल्या हल्ल्यासाठी तयार नव्हते, तरीही त्यांनी प्रशंसनीय शौर्य दाखवले. घटनास्थळाच्या एका बाजूला टेकडी आहे, ज्यात नक्षलवाद्यांनी मोर्चा बांधला होता. जवान मोकळ्या मैदानाच्या मध्यभागी होते. चकमकीच्या दरम्यान, गावात रक्ताच्या डागांमध्ये प्रथमोपचार सिरिंज आणि इतर औषधे आढळली. एकीकडे नक्षलवाद्यांशी लढतानाच जवान स्वत:वर आणि जखमी सहकाऱ्यांवर प्रथमोपचार करत राहिले. त्यांनी जखमी साथीदारांना बाहेर काढण्याचाही प्रयत्नही केला.
रॉकेट लाँचर, ग्रेनेड लाँचर…तरीही जवान लढले!
घटनास्थळावरून जी छायाचित्रं समोर आली आहेत त्यात असे दिसून आले आहे की जखमी असूनही जवान झाडांच्या आडोशाने लढा देत राहिले. नक्षलवाद्यांनी मशीनगन, ग्रेनेड लाँचर, रॉकेट लाँचरचा वापर केला. संध्याकाळी जवानांनी गोळीबार थांबविला आणि छावण्यांकडे गेले, तर नक्षलवादी रात्री खेड्यात आणि आसपास फिरत राहिले. डोंगरावर पाच जवान शहीद झाले. जवान निघून गेल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांचे मृतदेह खाली नेले आणि तिथेच एक मृतदेह तिथे असलेल्या झाडाजवळ ठेवला.
जवानांचा त्याग व्यर्थ जाणार नाही
दरम्यानहल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपला निवडणूक कार्यक्रम सोडून दिल्लीला परतले. त्यांनी उच्च अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वीरगती मिळालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली देत म्हणाले, आम्ही त्याच्या कुटूंबाला आणि देशाला आश्वासन देतो की ज्या शूर जवानांनी देशासाठी रक्त सांडले आहे ते व्यर्थ जाणार नाहीत. नक्षलवाद्यांविरूद्धचा लढा जोमाने सुरू राहील.
तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीवर गंभीरपणे लक्ष ठवण्यास सूचना केली. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशावरून सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंगही रविवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्तीसगडला पोहोचले.