भाजपचे नेते माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल या मोठ्या नेत्यांनी शुक्रवार, ८ जानेवारीला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. गेल्या अनेक दिवसांपासून हे नेते शिवसेनेच्या संपर्कात होते. मुख्यमंत्र्यांनीही बागुल आणि गिते यांच्या प्रवेशावर आनंद व्यक्त केला. या दोघा नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाने नाशिकमध्ये भगवी शाल अधिक उबदार अन तेजस्वी बनेल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
राऊत म्हणाले, आज नाशिकमध्ये वसंत गीते आणि बागुल प्रवेश करत आहेत. आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात होतो. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर देखील गीते आणि बागुल यांची चर्चा झाली. त्यानंतर प्रवेश निश्चित झाला. आज त्यांचा प्रवेश होतो आहे. हे दोन्ही नेते सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेतील. त्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा गड अभेद्य बनवण्याकरीता यांचे योगदान महत्वाचे राहणार असल्याचे,राऊत यांनी म्हंटले आहे.
गीते आणि बागुल हे आम्हाला नवीन नाही. आमच्यात परकेपणा नाही. मी स्वत: गीते आणि बागुल यांचे परिवारात मनापासून स्वागत करतो. प्रवेशावेळी अनेक मतभेद असतात परंतु यांच्या प्रवेशाबाबत कोणतेही मतभेद दिसून आले नाही, असेही राऊत म्हणाले.