मुक्तपीठ टीम
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा थेट परिणाम रक्ताच्या साठ्यावर पडला आहे. राज्यात पुढील फक्त ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व ओषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. कोरोनासोबतच आता हे नवे आव्हान राज्य सरकारपुढे उभे ठाकले असून नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यात कोरोना काळात रक्तसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. कोरोनामुळे रक्त संकलनाचे काम खूपच कमी झाले आहे. आता तर केवळ ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. यावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात यावं, असंही शिंगणे यांनी म्हटलंय. मागील वर्षी देखील अनेकदा असा तुटवडा निर्माण झालेला तेव्हा रक्तदात्यांनी रक्तदान करून ती समस्या दूर केली होती.
या पार्श्वभूमीवर रक्तसाठा वाढवणे हे मोठे आव्हान असणार आहे. रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना आता पुढाकार घेत या समस्येवर मार्ग काढण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. शिवाय कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकांनाही पुढे यावे लागणार आहे.