मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांच्यावर काल रात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्याबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील.
रुग्णाच्या पित्ताशयात झालेले पित्ताचे खडे पित्तनलिकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती काहीशी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता. त्याच्यामुळे त्यांच्यावर मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे बुधवारी शस्त्रक्रिया केली असती तर त्यांच्या स्वादूपिंडाला आणखी सूज आली असती. त्यांच्या तब्येतीवर आणखी परिणाम झाला असता. त्यांच्या पित्तनलिकेच्या आतमध्ये जाऊन तो खडा काढण्यात आला. त्यामुळे पवार यांच्या लिव्हरवरचा दाब कमी होणार आहे. त्यांना झालेली कावीळसुद्धा कमी होईल.
शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती कळताच त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली जात असल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि दिग्गजांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं की, शरद पवारजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021