ठळक बातम्या : १) पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला असून ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. २) राज्यात आणि मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. परिणामी मुंबई महापालिकेने कोरोनासंबंधी नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत वॉर्ड वॉर रुम तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे. ३) राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. ४) करोनावर मेडिकलमध्ये (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे. ५) जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज, मंगळवारी ३० मार्च होणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे सोहळ्याची तयारी करण्यात आली असून, यंदा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. त्यामुळे देहू गावाच्या हद्दीत दोन दिवसांची संचारबंदी लागू असून, देऊळवाडा आणि गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.