पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यापासून वर्षानुवर्षे प्रलंबित अनेक विषय मार्गी लावले आहेत. त्यातून त्यांनी देशातल्या सर्वसामान्यांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एक तृतीयांश बहुमताने विजयी होईल, अन्य विरोधकांचा पुरता सुफडा साफ होईल, या भितीनेच काँग्रेससह विरोधी पक्ष कृषी कायद्याला विरोध करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. आधी कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र महाराष्ट्रात कृषी कायद्यांचे समर्थन करण्यासाठी भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी येथे कृषी कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या या भव्य ट्रॅक्टर रॅलीच्या समारोप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी या रॅलीत १० ते १२ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे, राज्याचे माजी कृषीमंत्री तथा भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे, आ. नितेश राणे, रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर, समिधा नाईक, प्रमोद जठार, अजित गोगटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून सर्वसामान्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित सर्व विषय मार्गी लावले आहेत. शेतकऱ्यांना शेतीमध्ये जास्त फायदा मिळावा यासाठी त्याची मृदा परिक्षणासाठी सॉईल हेल्थ कार्ड योजना आणली. वर्षानुवर्षे प्रलंबित अशा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करुन शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव मिळवून दिला. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये जमा केले. प्रत्येकाच्या घरात शौचालये बांधून दिली. याशिवाय माता भगिनींसाठी ही अनेक योजना आणल्या. या सगळ्यांमुळे आज पंतप्रधन मोदी यांनी सर्वसामान्यांच्या मानात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. देश वेठीस धरण्याचे काम काही मुठभर शेतकरी आंदोलक करुन करत आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत आणि हे दाखवयाचे असेल तर संपूर्ण देशात या कायद्याचं समर्थन शेतकरी करतोय, हे दाखवण्याचं माध्यम म्हणजे ही रॅली आहे. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, या भितीतूनच सध्या पंजाबमधील काही मूठभर शेतकऱ्यांना समोर करुन विरोधक कृषी कायद्याला विरोध करत आहेत. पण शेतकऱ्यांना सर्व माहिती आहे. त्यामुळे ते याला बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार असताना राज्याचा पणन मंत्री मी होतो. त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांना फायद्यासाठी हा कायदा राज्यात लागू केला. त्यावेळीदेखील सुरुवातीला बाजार समित्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मी स्वत: सांगितलं होतं की, हा कायदा लागू झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समित्या तशाच सुरु राहितील. आज राज्यात काय चित्र आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या तशाच चालू आहेत. उलट संत सावतामाळी आठवडी बाजारमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल थेट ग्राहकांना विकता येऊ शकत असल्याने, शेतकऱ्यांचे उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वी संमत करण्यात आलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत हे विरोधकांना सहा महिन्यांनंतर कळले. ही आश्चर्याची बाब आहे. विरोधक काय सहा महिने झोपले होते. एका राज्यातील मुठभर शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. मुळात या कायद्यांचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मोदी सरकारने युरियाचा काळा बाजार बंद केला. शेतमजूरांना साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन सुरु केली, पिक विमा योजना आणली. सर्वप्रकारची नुकसान भरपाईची यात तरतूद केली गेली आहे. मोदींचा विरोध हा फक्त आकसापोटी सुरु आहे. विरोधक घाबरलेले आहेत. नागरिकांच्या मनात मात्र मोदी जी यांच्याबाबत प्रेम आहे आणि विरोधकांना शेतकऱ्यांबाबत कोणतेही प्रेम नाही, असे पाटील म्हणाले.
भाजपा नेते नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रं हाती घेतल्यापासून देश झपाट्याने प्रगती करत आहे. ७० वर्षांपासून शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे कायदे मोडित काढून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत आहे, नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार असेल तर त्यात बिघडले कुठे असा सवाल उपस्थित केला. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष नहेमीच कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.