मुक्तपीठ टीम
प्रतिभा असते कुठेही. जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमता प्रत्येकात असते. गावचे विद्यार्थी तर साधने आणि संधी मिळाली तर करून दाखवतात, शहरांपेक्षा ते कुठेच कमी नसतात. पालघर जिल्हा परिषदेच्या सफाळ्यातील कर्दळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेला ब्लू टूथ डीजे अशा कल्पकतेचेच उदाहरण.
कर्दळच्या शाळेत इयत्ता ७वी च्या वर्गात विशाल दिवे आणि हर्षद राजापकर हे कर्दळ डोंगरी पाड्यावर राहणारे दोन विद्यार्थी आहेत. त्यांचे वेगळेपण असे की ते नेहमी काही ना काही वैज्ञानिक प्रयोग करत राहतात. लॉकडाउनचा काळही त्यांच्या कल्पकतेला बांधून ठेऊ शकला नाही. त्या काळात यांनी अनेक छोटे यशस्वी विज्ञान प्रयोग केले आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मिळून टाकाऊ वस्तूंपासून एक दर्जेदार ब्लू टूथ डीजे बनविला आहे. शाळेतील शिक्षकांना व शाळेत येणाऱ्या प्रत्येकाला हा डीजे म्हणजे त्या मुलांच्या कल्पकतेचा उत्कृष्ठ नमुना वाटतो. कारण कुठेही तो साधनांच्या अभावात मुलांनी बनवला आहे, असे वाटत नाही. तो प्रयोग दाखवताना त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या शोधाच्या सार्थ अभिमानाचे स्मितहास्य झळकते.
मुलांच्या यशाचे श्रेय त्या शाळेतील शिक्षकांचेही आहे. शाळेतील उपक्रमशील शिक्षक राजन गरुड नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांचा मार्गदर्शनाखाली व प्रेरणादायी कामामुळे शाळेतील विद्यार्थी सतत वेगवेगळ्या उपक्रमात यशस्वी होतात. त्याच बरोबर मुख्याध्यापिका सौ छाया ठाकूर शाळेतील शिक्षक कल्पेश पाटील, आरती संखे यांचेही विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभते.
विशाल आणि हर्षद या विद्यार्थ्यांच्या कल्पक कामगिरी बद्दल शाळेतील व केंद्रातील शिक्षक,पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व केंद्र प्रमुख कुंदा संखे यांनी अभिनंदन केले आहे. मुक्तपीठ टीमकडूनही विशाल आणि हर्षदचे खूप खूप कौतुक.