मुक्तपीठ टीम
रात्री झोपण्याच्या आधी आपले विचार, राग, संताप आणि इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून शांत झोप घेणे हे आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. भांडणे विसरल्यानंतर आणि मन शांत ठेऊन झोप घेतल्यानंतर दीर्घ आयुष्यासह, व्यक्ती निरोगी राहते. असे अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
भांडण त्याच दिवशी विसरा जेणेकरुन त्याचा दुसर्या दिवशी परिणाम होणार नाही. जर आपण दिवसाच्या अखेरीस सर्व भांडणे सोडविली तर त्याचा दुसर्या दिवशी तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर अधिराज्य गाजवण्यापासून रोखल्यास किंवा विचार करण्याचे थांबवल्यास आपण मानसिकदृष्ट्या निरोगी राहता. याउलट, जर अशा गोष्टी मेंदूत कायम राहिल्या तर तणावाची पातळी वाढते आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.
नकारात्मक गोष्टी विसरण्यात वृद्धांचा आकडा मोठ्या प्रमाणात पुढे आहे. हे संशोधन २,०२२ लोकांवर केले गेले. यात ३३ ते ८४ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. ८ दिवसांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भावना आणि अनुभवाबद्दल विचारले गेले. संशोधकांच्या टीमला असे आढळले आहे की, सरासरी ४५ वर्षे वयाच्या लोकांपेक्षा वयस्कर लोक नकारात्मक गोष्टी लवकर विसरतात.
तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. प्रत्येक मनुष्याला कधीना कधी तणावाचा सामना करावा लागतो, तो पूर्णपणे थांबवता येत नाही. परंतु, काही प्रमाणात ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो जेणेकरून आपण निरोगी राहू शकता. यासाठी आपण व्यायाम, योग किंवा इतर अशा गोष्टी ज्यामध्ये आपल्याला रस आहे त्या आपण करू शकतो. यामुळे नक्कीत तणाव कमी होऊल आणि शांत झोपही लागेल.