कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आज महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने १ कोटीचा आकडा (१०,०१६,८५९) ओलांडला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
गेल्या २४ तासांत १९ हजार ५८७ रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता वाढून ९६.३६% झाला आहे. मात्र, सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील अंतर सतत वाढत आहे. ही संख्या ९७,८८,७७६ एवढी आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण उपचाराधीन रुग्णांच्या ४४ पट आहे.
देशातील एकूण बाधितांची संख्या आज २ लाख २८ हजार 83 इतकी असून एकूण बाधित रुग्णांच्या केवळ २.१९% एवढी आहे. तसेच बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी ५१% रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ अशा पाच राज्यांत केंद्रित आहेत.
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९६.३६% आहे. त्याचबरोबर सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर देखील ९०% पेक्षा जास्त आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. बाधित रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या तुलनेत कमी आहे.
चाचणी पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे भारताचा सकारात्मकता दरही खाली आला आहे. दैनिक सकारात्मकता दर ३ टक्क्यांच्या खाली आहे. तसेच १७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक सकारात्मकता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. दरम्यान ६ जानेवारीला बरे झालेल्या रुग्णांपैकी ७९.८ टक्के हे १० राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
तसेच केरळमध्ये काल एका दिवसात सर्वाधिक ५ हजार ११० रुग्ण बरे झाले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात २ हजार ५७० रुग्ण बरे झाले आहेत. तर नवीन बाधित रुग्णांपैकी ८३.८८% रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत ६ हजार ३९४ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ४ हजार ३८२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर छत्तीसगडमध्ये काल १ हजार 50 नवीन रुग्ण आढळले. तसेच गेल्या २४ तासांत २२२ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी ६७.५७% हे सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रात काल एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यूची (६६ मृत्यू) नोंद झाली. केरळमध्ये २५ तर पश्चिम बंगालमध्ये २२ नवीन मृत्यूची नोंद झाली.