मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत टाइम्स नाऊ- सी वोटरने एक ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या पोलनुसार, भाजपाचे आव्हान असूनही, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहणार आहे. डाव्यांचा शेवटचा किल्ला केरळही एलडीएफ म्हणजे डाव्या आघाडीकडे कायम राहील. तामिळनाडूमध्ये द्रमुक सत्तेवर येऊ शकेल. तर भाजपाशासित आसाममध्ये मोठे आव्हान उभे राहू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नेमका हाच अंदाज वर्तवला होता. त्यांच्यावर भाजपा नेत्यांनी टीकाही केली होती.
पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर ममताच, भाजपाला चांगल्या जागा, डावे-काँग्रेसला फटका
ओपिनियन पोलनुसार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा आपले सरकार स्थापन करेल. तसेच तृणमूल काँग्रेसला १६० जागा मिळू शकतात. पण, मागील निवडणूकीच्या तुलनेने यावेळी तृणमूल काँग्रेसला कमी जागा मिळू शकतात. २०१६मध्ये पक्षाने २११ जागांवर विजय मिळवला होता. तर २०० जागांवर विजय मिळवू असा दावा करणाऱ्या भाजपा सत्तेपासून दूरच राहण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपाला फक्त ३ जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी १०० जागांवर विजय मिळू शकतो.
दरम्यान, युतीकरून लढणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे यात मोठे नुकसान होणार आहे. त्यांना जास्तीत जास्त २६ जागांवर यश मिळू शकते.
बंगालमध्ये मुख्यमंत्री पदासाठी ममता बॅनर्जींना पसंती मिळाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना पसंती मिळाली आहे. पण अंतर खूप आहे.
अण्णाद्रमुक-भाजप जाणार, द्रमुक-कॉंग्रेस सत्तेवर येणार!
दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात डीएमके-कॉंग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार २३४ उमेदवारांच्या या विधानसभेत ही युती १७७ जागा मिळवेल.
दरम्यान, कमल हसन यांच्या नेतृत्वात एमएनएम आणि टीटीव्ही दिनाकरण यांच्या एएमएमकेला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर डीएमकेच्या चीफ एमके स्टालिनला राज्यातील लोकांची पहिली पसंती आहे.
आसाममध्ये कडवी लढत, भाजपा सत्ता वाचवणार
भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाममध्ये एनडीए आणि यूपीए यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. ओपिनियन पोलमध्ये १२६ जागांच्या विधानसभेमध्ये सत्ता असलेल्या एनडीएला ६९ जागा आणि यूपीएला ५६ जागा मिळाल्या आहेत. यावेळी काँग्रेस बद्रुद्दीन अजमलच्या एआययूडीएफ, बोडो पीपल्स फ्रंट आणि डाव्या पक्षांशी युती करून निवडणुका लढवत आहे.
केरळमध्ये डाव्या आघाडीला बहुमत
ओपिनियन पोलमध्ये केरळमधील सत्तेत असलेल्या सत्ताधारी एलडीएफच सत्तेत कायम राहण्याचा अंदाज आहे. पिनाराय विजयन यांच्या नेतृत्वातील युती १४० जागांच्या विधानसभेत ७७ जागावर येण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये या युतीला ९१ जागा मिळाल्या होत्या. पोलमध्ये जागा कमी झाल्या तरी विजयन सरकारला बहुमत मिळताना दिसत आहे.
पुद्दुचेरीत एनडीएची सत्ता
ओपिनियन पोलनुसार पुद्दुचेरीच्या ३० जागांच्या सभागृहात २१ जागा जिंकून एनडीए सत्तेत परत येईल. तर कॉंग्रेस आणि डीएम यांची युती या निवडणुकीत केवळ ९ जागा जिंकतील. येथे मुख्यमंत्रिपदासाठी एआयएनआरसीचे एन रंगसामी सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणून उभारून आले आहे. त्यांना ५०% लोकांनी या पदासाठी निवडले आहे. सध्या पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.
मतदान आणि मतमोजणी कधी?
- तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
- आसाममध्ये २७ मार्च ते ६ एप्रिल यादरम्यान तीन टप्प्यात मतदान होईल.
- पश्चिम बंगालमध्ये २७ मार्च ते २९ एप्रिल या काळात ८ टप्प्यात मतदान होईल.
- तर या सर्व राज्यांमध्ये २ मे रोजी मतमोजणी केली जाईल.