मुक्तपीठ टीम
“गेल्या काही दिवसात राज्यात ज्या घटना समोर येतात, त्या अत्यंत चिंताजनक आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. भाजपाच्या शिष्टमंडळानं आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरेंकडून बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घ्यावी. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते करावे, ही मागणी राज्यपाल-सरकार संघर्षाची नांदी ठरणार असल्याची शक्यता आहे.
या भेटीनंतर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले. मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप करतानाच फडणवीसांनी आज काँग्रेसलाही लक्ष्य केले. ते म्हणाले, “काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलत आहेत. इथले नेते वेगळे बोलत आहेत. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही. काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे?”
या भेटीदरम्यान राज्यातील सध्याच्या घडामोडींची गंभीर दखल घेत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं केल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्याला वाचवणं गरजेचं आहे त्यामुळेच राज्यपालांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी विनंती आम्ही केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
फोन टॅपिंग प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा लक्ष्यवेध
• गेल्या काही आठवड्यांपासून राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक
• “मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातील मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट.
• मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे.
• शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला.
• “काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे.
• दिल्लीतील नेते वेगळे बोलत आहेत.
• इथले नेते वेगळे बोलत आहेत.
• केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही.
• काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे?
• मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे.
बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, ही आमची मागणी असल्याचं भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. १०० हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही भाजपा नेत्यांनी सांगितले आहे.