गुन्हे महत्वाचे : 1) मुंबईत विविध ठिकाणी बनावट शाईचा पुरवठा करणाऱ्यांची आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने पोलखोल केली आहे. पोलिसांनी अँटॉप हिल येथील एका खोलीमध्ये छापा टाकून सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ॲपसॉन, कॅनन यांसारख्या नामांकित कंपन्यांची लेबल्स लावून ही बनावट शाई झेरॉक्स, स्टेशनरी तसेच इतर दुकाने आणि कार्यालयांना पुरवली जात होती. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. 2)पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील पतीला ठाणे न्यायालयाने १० वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी चार लाख रुपये भरपाई म्हणून पीडित महिलेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा प्रकार ११ वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये घडला. 3)नोकरी लावण्याच्या बहाण्याने नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर भागात दोन तरुणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली. 4)मोबाईलची स्क्रिन तुटल्यानंतर विमा कंपनीकडून पैसे मिळावे यासाठी महिलेने प्रचंड शक्कल लढवली. मात्र, विमा कंपनीच्या निकषात ते बसत नसल्याने विमा कंपनीकडून मोबाईलची भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महिलेने विमा कंपनीकडून नवा मोबाईल मिळावा यासाठी विचित्र कट आखला. काही लोकांनी तिच्या हातून मोबाईल हिसकावून नेला, अशी तक्रार तिने पोलिसात दिली. मात्र, पोलिसांनी तिचा कट उधळून लावला. हा सर्व प्रकार नेमका कसा झाला, त्याचा संपूर्ण घटनाक्रम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 5)विरारमध्ये गेल्या काही दिसांपासून सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे. त्या अनुषंगाने विरार पोलिसांनी तपास केला असता या सोनसाखळी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींनी एकट्या विरार हद्दीत १४ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ७४ हजार ९५०,रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला आहे.