मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी ठरली. त्यांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ केलेली चुकीची असल्याचा दावा केला. त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप केला. त्यात राजकारणी, पोलीस अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. ६.३ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्रीय गृहसचिवांना ते देणार असलेल्या या ६.३ जीबी डेटामध्ये काय दडलंय अशी चर्चा राजकीय, प्रशासकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
परबीर सिंग यांच्या पत्रावरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचे वादळ घोंघावते आहे. भाजपा आणि परमबीर यांच्याकडून झालेले आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत वेगवेगळी कागदपत्रे दाखवत शरद पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा दावा केला आहे. तसेच त्याच्याही पुढे जात त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलात बदल्यांसाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला. तत्कालीन अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुराव्यांसह एक गोपनीय अहवाल सादर केला होता, असा महागौप्यस्फोटही त्यांनी केला. याप्रकरणी आपण ६.३ जीबीचा डेटा असलेला पुरावा केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन सादर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. फडणवीस या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत.
फडणवीसांचे पवारांना टोमणे
फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेले. पवारांइतके माझं इंग्रजी चांगलं नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपली पत्रकार परिषद सुरू केली.
फडणवीसांचे पवारांच्या क्लिनचीटला आव्हान
- १५ तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते.
- पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची नोंद आहे.
- अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही.
- सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं. मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली. हे आता उघड झालं आहे.
पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश
- देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर पोलीस दलात बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला.
- फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला.
- त्यात राजकारणी, पोलीस अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.
- ६.३ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.
- बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं फडणवीस म्हणाले.
- बदल्यांचं रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकलं.
- सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला. सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी तसे केले का, असेही ते म्हणाले.