मुक्तपीठ टीम
सत्तेत असताना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वर्ग केल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी निशाणा साधला होता. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि बँकर अमृता फडणवीस यांनी ट्विट करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीसांनी एकेरी उल्लेख करत जगतापांना प्रत्युत्तर दिले आहे.
अमृता फडणवीस यांनी, “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बँके’ ला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय”, असे ट्वीट केले आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटमधील भाई जगतापांच्या एकेरी उल्लेखांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिसेस फडणवीसांचा जगतापांवर का संताप?
राज्यात सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्याचा उल्लेख करत भाई जगतापांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, “त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांचा हा प्रश्न भाजपाच्या सत्ताकाळात अॅक्सिस बँकेत अधिकारपदावर असणाऱ्या अमृता फडणवीस यांना चांगलाच झोंबला. त्यामुळे त्यांनी संतापून भाई जगताप यांना एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
भाईंनी काढले आणि वहिनी संतापळ्या ते प्रकरण काय?
- महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
- त्यांचे वार्षिक पगार ११ हजार कोटींपेक्षा जास्त आहेत.
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलीस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ या राष्ट्रीयकृत बँकेतून अॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती.
- माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे फडणवीस सरकारने तसे केल्याचा संबंध जोडला जात होता.
- त्यावेळी भाजपाने प्रत्युत्तर देताना अॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती, असे स्पष्टीकरण दिले होते.
- फडणवीस म्हणाले होते, “एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही.”
- “माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही,” असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.