कॉर्पोरेट कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसी प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच नाशिक येथे गंगापूर धरणावर बोट क्लबजवळ एक अत्याधुनिक कन्व्हेशन सेंटर उभारणार आहेत.
एमटीडीसीने या केंद्राचे बांधकाम आधीच सुरू केले आहे. अधिवेशन केंद्रामध्ये तीन सभागृहे असून त्यांची एकूण क्षमता १००० जणांची आहे. एक मोठे सभागृह असेल त्याची क्षमता ६०० असेल आणि उर्वरित सभागृहाची क्षमता २०० ची असेल तेथे प्रशिक्षण, कॉन्फरन्स किंवा अगदी लहान प्रदर्शनदेखील आयोजित केले जाऊ शकते. सुमारे आठ एकर क्षेत्रावर बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एमटीडीसीच्या या केंद्राचे बांधकाम यावर्षी मार्चअखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. आणि त्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर त्याचे उद्घाटन केले जाईल.
लिंक क्लिक करा, पाहा व्हिडीओ: https://youtu.be/k8qKcXb6tEg
एमटीडीसीचे अधिकारी महेश बागुल यांच्या माहितीनुसार, “प्रस्तावित अधिवेशन केंद्राचे बांधकाम आधीच प्रगतीपथावर आहे. जवळपास ६०% बांधकाम पूर्ण झाले असून मार्चअखेरपर्यंत सर्व बांधकाम पूर्ण होतील, तर अंतर्गत कामांना सुमारे तीन महिने लागतील. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले अधिवेशन केंद्राचे उद्घाटन जूनअखेरपर्यंत होईल.”
एमटीडीसीने यापूर्वी गंगापूर धरणावर बोट क्लब जवळ ३५ खोल्या असलेले रिसॉर्ट बांधले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.