क्रिडा थोडक्यात : १) दंगल गर्ल गीता फोगट आणि बबीता फोगाटची मामेबहीण असलेल्या रितिका फोगाटने आत्महत्या केली आहे. राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. कुस्ती क्षेत्रात फोगाट कुटुंबाने नाव कमावलं आहे. रितिकाच्या आत्महत्येने त्यांना मोठा धक्का बसल्याचं कळत आहे. २) कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या अनेक निर्बंधांचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसल्याचं पाहायला मिळालं आहे. क्रिकेटच्या मैदानांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत याचे पडसाद उमटले आहेत. पण, अखेर खेळाडूंना मोठा दिलासा देत महाराष्ट्र राज्य शासनानं क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. कोरोना नियमांचं पालन करावं अशी सूचनाही शासनाकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळं नऊ महिन्यांनंतर आता खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या करिअरच्या वाटांवर लक्ष केंद्रीत करु शकणार आहेत.मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बॅडमिंटन असोसिएशन यांनी आखून दिलेल्या काही नियमांचं पालन खेळाडूंना करणं बंधनकारक असणार आहे. 3) पाचव्या आणि निर्णायक सामन्यात दमदार विजय मिळवत भारताने मालिका ३-२ अशी जिंकली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाला मात देत असताना डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी अर्धशतके झळकावत १३० धावांची भागीदारी साकारली. पण हे दोघे बाद झाले आणि इंग्लंडचा संघ विजयापासून दूर गेला. ४) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि निर्णायक २०-२० भारतीय संघ कसा निवडण्यात यावा, याबाबतचा सल्ला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. सचिनने एएनआइला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ” भारतीय संघात फक्त युवा खेळाडूंनाच संधी द्यावी, असा विचार करता कामा नये. कारण युवा खेळाडूंपेक्षा आपल्याला सर्वोत्तम भारतीय संघ कसा निवडता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. ५) चौथ्या २०-२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला मैदान सोडावे लागले होते. सामन्याच्या १६व्या षटकानंतर कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता आणि त्यानंतर तो मैदानात परतला नव्हता. त्यावेळी रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.