मुक्तपीठ टीम
लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज स्फोटानंतर आग लागली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेनंतर अखेर या रासायनिक उद्योगांनी भरलेल्या औद्योगिक वसाहतीकडे मुंबईतील वरिष्ठांचे लक्ष गेले आहे. आता योग्य ती यंत्रणा उभारण्यासाठी तातडीने पावलं उचलली जाणार आहेत.
या अपघातात एक कामगार गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५५ लाख रुपये देण्यात येतील असे घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आले आहे. जखमी असणाऱ्या कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये कंपनी देणार आहे.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे. सोबतच या ठिकाणी पोलीस यंत्रणा आपले वेगळे नियंत्रण कक्ष सुरू करेल. हा सर्व औद्योगिक परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली यापुढील काळात राहील याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास सोबतच त्यांना रोजगार मिळण्याच्या बाबत कार्यवाही करण्यात येईल. या दुर्दैवी घटनेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून पालकमंत्री अनिल परब यांनीही याबाबत माहिती घेतली राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व कंपनीच्या अधिकार्यांकडून याबाबत माहिती घेतली